…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!

चिपळूण | प्रतिनिधी |
पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यातच कुंभार्ली व कळकवणे येथील पशुधन पर्यवेक्षकांपैकी एकाची जिल्हा बदली, तर दुसर्‍या कर्मचार्‍याची बदली होत असून, तेथील पशुवैद्यकीय केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत या दोन पशुवैद्यकीय दवाखान्यात नवीन कर्मचारी हजर होत नाही, तोपर्यंत संबंधितांना कार्यमुक्त करू नये, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा पं.स.तील शिवसेनेचे गटनेते राकेश शिंदे यांनी दिला आहे.
या दोन कर्मचार्‍यांची बदली झाल्यास अर्धा तालुका पशुसंवर्धन विभागाच्या सेवेपासून पूर्णतः वंचित राहणार आहे. त्यामुळे जोपर्यंत नवीन कर्मचारी हजर होत नाही, तोपर्यंत संबंधित पशुधन पर्यवेक्षक यांना कार्यमुक्त करू नये. दुर्दैवाने ही दोन पशुवैद्यकीय केंद्र कर्मचान्यांअभावी बंद राहिली तर नाईलाजास्तव आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल. यासाठी अन्यायग्रस्त शेतकरी पशुपालक यांना घेऊन चिपळूण पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून ते बंद करेन, असा इशारा श्री. शिंदे यांनी दिला आहे.

Exit mobile version