। नेरळ । प्रतिनिधी ।
गेल्या दोन दिवसात कर्जत तालुक्यातील खांडस, वावे, आंबिवली आणि इतर दोन गावामध्ये काही लम्पी सदृश्य गो वर्गीय जनावरांमध्ये दिसल्या आहेत. स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत त्याबाबत तात्काळ पंचायत समिती कर्जत व जिल्हा प्रशासनास तसा अहवाल देण्यात आला आहे. स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत तपासणी करीता रक्तजल व इतर आवश्यक नमुने पुणे येथील प्रयोगशाळेमार्फत भोपाळ येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

याबाबत माहिती मिळताच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम तसेच उपआयुक्त रत्नाकर काळे, सह आयुक्त राजेश लाळगे यांची कर्जत तालुक्याला तातडीने भेट दिली. या अधिकार्यांनी लम्पी सदृश्य जनावरांची पाहणी केली. कर्जत तालुक्यातील पशुधन विकास अधिकर्यांना योग्य सुचना केल्या आहेत. यावेळी कर्जत डॉ. गिरीष बराडकर, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिति कर्जत डॉ. मिलिंद जाधव व स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत चर्चा केली.
सध्या त्या जनावरांना विलगिकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. सविस्तर माहिती घेतली असता, यातील बहुतेक जनावरे ही जिल्ह्याबाहेरुन 15-20 दिवसांपूर्वी पशुपालकांनी आणली असल्याचे आढळले. डॉ. रत्नाकर काळे व डॉ. शामराव कदम यांनी पशुसंवर्धन विभाग, कर्जतमधील सर्व अधिकारी- कर्मचारी यांची सभा घेवुन त्यांना आवश्यक मार्गदर्शन हे केले आहे. तसेच स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाने व इतर तालुक्यातील अधिकारी-कर्मचारी यांच्या टीम बनवून, पशुसंवर्धन विभागाकडून गावांमध्ये इतर जनावरांची आवश्यक आरोग्य तपासणी, लंपी सदृश्य जनावरांचे औषधोपचार मोहीम स्वरूपात व मोफत करण्यात येत आहेत. तसेच, गावांमध्ये व कर्जत तालुक्यातील इतर गावामध्ये गोचीड- गोमाशा, चिलटे, मच्छर यांचे निर्मुलन करण्याबाबत पशुपालकांना आवाहन हे करण्यात येत आहे.
पशुपालकांनी आपल्या पशुधनाची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, घाबरण्याची आवश्यकता नाही, परंतु, सतर्क सतर्क राहावे. आपल्या जनावरामध्ये कोणतीही लंपी चर्म रोग सदृश्य लक्षण आढळल्यास तात्काळ स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिति कर्जत यांना संपर्क साधण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिति कर्जत डॉ. मिलिंद जाधव यांनी केले आहे.
शासनाच्या अधिसूचनेपणे महाराष्ट्र हा नियंत्रित क्षेत्र जाहीर झाला आहे. जनावरांचे बाजार, वाहतूक बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पशुपालकांनी जनावरांनी वाहतूक किंवा नविन जनावरे ही आपल्या गोठ्यात आणणे टाळावे, असे आवाहन सहायक आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉ. गिरीष बराडकर यांनी केले आहे.