। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरातील रस्त्यांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमधून केली जात आहेत. माथेरानमध्ये वाहतुकीचे एकमेव साधन असलेल्या घोड्यांचे पाय धूळविरहित रस्त्यावरून घसरत असतात. त्यामुळे संबंधित रस्त्यांवरून घोड्यांचे पाय घसरणार नाही याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन प्राधिकरणकडून कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांना देण्यात आले. दरम्यान, आता माथेरानमधील तीव्र उताराच्या रस्त्यांवर जांभा दगड लावून घोड्यांसाठी रस्ता बनविला जाणार आहेत.
माथेरान शहरातील धूळविरहित रस्त्यांवरून तेथील वाहतुकीचे साधन असलेल्या घोड्यांचे पाय घसरतात. त्यामुळे अनेक अपघात घडत असून, या समस्या दूर होण्यासाठी माथेरानमधील अश्वपाल संघटनेने अनकेदा आंदोलने केली आहेत. मात्र, कोणताही मार्ग निघत नसल्याने अश्वपाल संघटनेकडून आ. महेंद्र थोरवे यांना भेटून आपली कैफियत मांडली होती. त्यावेळी आमदार थोरवे यांनी दिवाळी झाल्यानंतर मुंबईत जाऊन एमएमआरडीएच्या आयुक्तांची भेट घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आमदार थोरवे यांनी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त गोविंदराव यांची भेट घेतली आणि माथेरानमधील रस्त्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी प्राधिकरणचे मुख्य अभियंता निमजे, कार्यकारी अभियंता अरविंद धाबे आणि माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तसेच प्रशासक सुरेखा भणगे आदी उपस्थित होते. त्या बैठकीत एमएमआरडीएकडून केल्या गेलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार थोरवे यांनी दस्तुरी ते शिवाजी महाराज चौक या महात्मा गांधी रस्त्यावरील अमन लॉज स्टेशनजवळील काळोखी भागातील जवळपास 200 मीटरच्या रस्त्यावर अति तीव्र उताराचा असल्याने घोडे घसरून पडतात आणि त्यामुळे अपघात होतात, असे स्थानिक घोडेवाल्यांचे म्हणणे होते. त्या ठिकाणी आणि माथेरानमधील अशा तीव्र उताराच्या रस्त्यांवर घोड्यांचे पाय घसरणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे यासाठी उपाययोजना करण्यावर भर द्यावा, अशी सूचना थोरवे यांनी अभियंत्यांना केली.
या महत्त्वाच्या प्रश्नावर आता प्राधिकरणकडून मार्ग काढण्यात आला असून, या उताराच्या रस्त्यावरील दीड मीटरच भाग हा जांभा दगड यांच्यापासून बनविण्यात यावा आणि उर्वरित अडीच मीटर रस्ता रुग्णवाहिका तसेच अग्निशमन गाडी आणि आगामी काळात येणार्या ई रिक्षासाठी वापर करण्यासाठी क्ले पेव्हरचे बनविण्यात यावेत यावर एकमत झाले. एमएमआरडीएकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त गोविंदराव यांनी दिले.