ग्रामीण रंगभूमीला भरीव योगदान देणार: अशोक म्हात्रे

नाट्य कलाकारांचा नाट्य सन्मान देऊन गौरव

| चिरनेर | वृत्‍तसंस्था |

ग्रामीण रंगभूमीला भरीव योगदान देऊन, ग्रामीण रंगभूमी सशक्त करायची आहे. ग्रामीण रंगभूमीवरील नाट्य संस्कृती अभंग राहावी, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, असा विश्वास अष्टगंध कला मंचाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक कान्हा म्हात्रे यांनी व्यक्त केला. अष्टगंध कला मंचाच्या वतीने रंगनायकांच्या ‘नाट्य गुणांचा सन्मान’ हा कार्यक्रम चिरनेर येथील मानसी फार्म हाऊस येथे शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी, रात्रीच्या सत्रात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते आपल्या मनोगतातून बोलत होते. यावेळी अष्टगंध कला मंचाच्या अध्यक्षपदी अशोक कान्हा म्हात्रे यांची फेरनिवड करण्यात आली.

तर सचिवपदी दत्तात्रेय घरत यांचीही फेरनिवड करण्यात आली आहे. याप्रसंगी व्यासपीठावर चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, शेकापचे चिटणीस सुरेश पाटील, चिरनेर ग्रा.प. सदस्य अरुण पाटील, नाट्यकलाकार प्रशांत पाटील, शेकापचे जगदीश ठाकूर, शेकापचेअमित मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते वैभव मोकल, कादंबरीकार गजानन म्हात्रे, नाट्यकलावंत दत्तात्रेय घरत, पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे, नाटककार हासूराम पाटील, नाटककार धनेश्वर म्हात्रे, नाट्य कलाकार रमेश कोळी तसेच अन्य कलाकार मान्यवरांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. यावेळी शेकापचे सुरेश पाटील यांनी स्वर्गीय नाट्यभूषण प. मा. पाटील गुरुजी व स्वर्गीय नटवर्य नाना पाटील या महानायकांच्या आठवणींना उजाळा देऊन, चिरनेरच्या समृद्ध रंगभूमीचा आपल्या भाषणातून आढावा घेतला. तर नाटककार हासूराम पाटील यांनी काया, वाचा व मनाने मी कलाक्षेत्राला समर्पित झालो आहे. मी जागर मांडला आहे, नाट्यकलेचा. रंगदेवता माझ्यावर प्रसन्न आहे. मी आपला सच्चा कलाकार मित्र आहे असे प्रांजळ उद्गगार त्यांनी यावेळी काढले.

दरम्यान नाट्य कलाकारांच्या नाट्य गुणांचा सन्मान हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रत्येक कलावंताला ‘नाट्य सन्मान’ हे गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे, नाटककार धनेश्वर म्हात्रे, कृष्णकांत म्हात्रे, दिगंबर कोळी, हासूराम पाटील तसेच अन्य कलाकारांनी आपल्या अभिनयाचे रंग उधळून, कार्यक्रमाच्या भव्यतेत अधिकच भर घातली. यावेळी कलाकारांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन चेतन पाटील व धनेश्वर म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी परिशा सरोदे, रुचिता म्हात्रे, निकिता पाटील, कृष्णकांत म्हात्रे, दिगंबर कोळी, रमेश कोळी, प्रज्योत पाटील, नवनीत माळी, विश्वनाथ घरत, शाम कोळी, चेतन पाटील, जयकिसन मोकल,अशोक म्हात्रे, रोशन घरत, हरेश पाटील, अमृत म्हात्रे या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version