भाजपसमवेत कदापि जाणार नाही – पवारांचा खुलासा

मोदींशी अन्य मुद्यावर चर्चा
राज्यात मात्र चर्चाना उधाण

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रात ईडीच्या कारवाईचा धडाका सुरु असतानाच बुधवारी (5 एप्रिल) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे. ही चर्चा इतकी शिगेला पोहोचली की राष्ट्रवादी -भाजप एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र पवारांनीच या वृत्ताचे खंडन करताना राष्ट्रवादी भाजपसमवेत कदापि जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
या भेटीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, मी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत दोन विषयांवर चर्चा केली. एक मागील दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघांमधील प्रतिनिधींच्या जागा मागील दोन अडीचवर्षांपासून रिक्त आहेत.तसेच संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबतही चर्चा केली. राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत, मात्र ते महाराष्ट्रातील सामना वर्तमानपत्राचे संपादक देखील आहेत. परवा त्यांचे फ्लॅट आणि अलिबागमधील अर्धा एकर जमीन ईडीने जप्त केल्या आहेत. हा अन्याय आहे. आम्ही ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या लक्षात आणून दिली, असं शरद पवार यांनी सांगितलं.

Exit mobile version