यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाहीः महेंद्र घरत

पत्रकार परिषदेत दिली माहिती

| उरण | वार्ताहर |

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश साम्राज्य शाहीच्या विरोधात लढून कामगारांनी मिळविलेले हक्क आणि अधिकार गमावण्याची वेळ आली असल्याचे मत इंटक या राष्ट्रीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्र घरत यांनी रविवारी उलवे नोडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यापुढे लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक मी लढवणार नसून इंटक आणि काँग्रेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजसेवा करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मध्यंतरी घरत यांनी लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. आता अचानकपणे घरत बॅकफुटवर आल्याने आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.

घरत यांनी दातृत्वाच्या भावनेतून मंदिराच्या बांधकामासाठी 1 लाख तसेच 50 हजारांचा धनादेश उपस्थित ग्रामस्थांनकडे सपुर्द केला. यावेळी पन्नास पेक्षा अधिक उपक्रमातील कामगारांना व्यवस्थापनाकडून जाहीर करण्यात आलेला सहानुग्रह अनुदान (बोनस) याची ही माहिती देण्यात आली. यामध्ये पीएन रायटर बिझनेस सोल्युशन, महापे येथील कामगारांना सर्वात अधिक 90 हजार तर उरणच्या गॅड लॉजिस्टिक कामगारांना दहा हजार रुपयांचे सहानुग्रह अनुदान देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. कामगार संघटनेची 12 हजारापेक्षा अधिकची सभासद संख्या आहे. त्यांच्या समस्या, वेतन करार आणि सोयी-सुविधा पुरविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सध्याचे सरकार कामगारांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा कमी करून मालक आणि भांडवलदार धार्जिण्या कायद्याची अंमलबजावणी करीत आहे. त्याचप्रमाणे फिक्स टर्म (काही कालावधीसाठी) रोजगार करार आदी कायदे हे कामगारांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवणारे असल्याने कामगारांचे भविष्य अंधारमय असल्याचे मत घरत यांनी व्यक्त केले.

दिपावली सणाचे औचित्य साधून घरत यांच्या शेलघर निवासस्थानी असलेल्या समाजमंदिर जवळ दिपावली पहाट या भक्तिमय वातावरणातील गीतांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन घरत यांच्या पत्नीच्या शुभ हस्ते पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस व इतर पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच कामगार संघटनेचे सचिव वैभव पाटील, एम.के.रमण, किरीट पाटील, राजेंद्र भगत, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, मिलिंद पाडगांवकर, रेखा घरत, कमळावर घरत, जेष्ठ पत्रकार दा.चा. कडू, जेष्ठ पत्रकार माधव पाटील, संध्या ठाकूर, मार्थन नाखवा यांच्यासह अन्य पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version