पाकिस्तानात खेळणार नाही

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

पाकिस्तानमध्ये नियोजित असलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत-पाक सामन्याची तारीख पाक क्रिकेट मंडळाने जाहीर केलेली असली तरी भारतीय संघ पाकमध्ये खेळण्यास जाणार नसल्याचे जवळपास निश्‍चित होत आहे. त्यामुळे ही स्पर्धाही हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जाण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये या स्पर्धेसाठी येईल हे गृहीत धरून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्पर्धेचा कालावधी तसेच भारत-पाक सामन्याची तारीख कधीच जाहीर केली आहे; पण आपला संघ पाकमध्ये न पाठवण्यावर बीसीसीआय ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचा संघ पाकमध्ये जाणार नाही, त्यामुळे आमचे सामने दुबई किंवा श्रीलंका येथे खेळवावेत, असे बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कळवल्याचे समजते.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धा येत्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान पाकमध्ये नियोजित आहे. 2008 मध्ये भारतीय संघ पाकमध्ये आशिया करंडक स्पर्धेत खेळला होता, त्यानंतर आतापर्यंत पाकमध्ये भारतीय संघ गेलेला नाही. 2012 डिसेंबर ते जानेवारी 2013 मध्ये या दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. त्यानंतर आतापर्यंत या दोन्ही देशांचे संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळलेले आहेत. एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेअगोदर झालेली आशिया करंडक स्पर्धाही पाकमध्ये नियोजित होती; पण त्या स्पर्धेसाठीही पाकमध्ये खेळण्यास बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला होता. परिणामी, ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात आली. अंतिम सामन्यात स्पर्धेतील नऊ लढतींपेकी तीनच सामने पाकमध्ये झाले होते. उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले आहेत. आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेबाबतही असेच घडण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी भारताचा संघ पाकमध्ये येण्याकरिता पाकिस्तान क्रिकेट मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांनी भारताच्या सर्व साखळी लढती लाहोर या एकाच शहरात नियोजित केल्या आहेत; पण बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आपला संघ पाकमध्ये पाठवण्यास तयार नाही. केंद्र सरकारने परवानगी दिली तरच भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाईल, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले. अखेरची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 2017 मध्ये इंग्लंडमध्ये झाली होती. त्यात पाक संघाने भारतीय संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.

Exit mobile version