शेतकर्‍यांना हमीभाव मिळवून देणार – पंडित पाटील

मांडला येथे भात खरेदी केंद्राचे पंडित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
| कोर्लई | वार्ताहर |
शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्नशील असून, पक्षाच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम हाती घेतले आहेत. विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, असे प्रतिपादन मुरुड तालुक्यातील मांडला येथे आधारभूत भात खरेदी केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी आ. पंडित पाटील यांनी केले. मुरुड तालुक्यातील मांडला सुदर्शन सहकारी भात गिरणी संघ येथे महाराष्ट्र को.ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वामन चुनेकर व शेकाप सहचिटणीस सी.एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्ली उपसरपंच मतीन सौदागर, सरपंच चेतन जावसेन व रिझवान फईम यांच्या पाठपुराव्यामुळे आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन पंडित पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी तालुका चिटणीस मनोज भगत, जि.प. माजी सदस्य वामन चुनेकर, तालुका सहचिटणीस सी.एम. ठाकूर, सुदर्शन सहकारी भात गिरणी संघाचे चेअरमन शशिकांत पारवे, व्हाईस चेअरमन रफाएल वेगस, प्रदीप धनावडे, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत चोगले, पं.स. माजी सभापती रमेश नागावकर, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष शरद चवरकर, अजित कासार, सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर (बोर्ली), मनीष नांदगावकर (उसरोली), काशिनाथ वाघमारे (भोईघर), मांडला ग्रामपंचायत सदस्य बशीर गोरमे, दीपक पाटील, मनोज भोपी, दिशा नांदगावकर यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अलिबाग-मुरुड मतदार संघाचे माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते आधारभूत भात खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. भुवनेश्‍वर सहकारी भात गिरणी व खरेदी विक्री क.म.लि.यांच्यावतीने मतीन सौदागर यांनी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांना हमी भाव मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विना सहकार नही उद्धार धर्तीवर मांडला येथे आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू केल्याने खर्‍या अर्थाने या पंचक्रोशीतील शेतकर्‍यांना निश्‍चित फायदा होणार आहे. शेतकर्‍यांना शेतमालाला हमी भाव मिळाला तर या विभागातील शेत लागवडीचे क्षेत्र वाढेल, असा विश्‍वास शेकाप तालुका चिटणीस मनोज भगत यांनी व्यक्त केला. यावेळी वामन चुनेकर, रफाएल वेगस, संतोष कांबळी यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नांदगावकर यांनी, तर आभार रफाएल वेगस यांनी मानले.

Exit mobile version