| रोहा | प्रतिनिधी |
ज्यांचे आई-वडील वृद्ध झाले असतील व मुले त्यांची देखभाल व पालन पोषण करत नसतील त्यांना मी त्वरित प्रत्येकी 10 हजार रुपये निर्वाह भत्ता मिळवून देणार, अशी ग्वाही रोह्याचे उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने बुधवारी (दि.1) रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, स्वतःची मिळकत मुलांच्या नावावर करण्याची घाई करू नका. जरी आज संबंध चांगले असले तरी शक्यतो आपल्या मिळकीतीचे मृत्युपत्र नोंदीकृत करा, असे सांगत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व आरोग्य विषयक त्यांना मदत मिळावी यासाठी आपण शिबीर आयोजित करू. मला आज तुमच्याकडे पाहताना माझ्या आई-वडिलांची आठवण आली, असेही प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड म्हणाले.
यावेळी संघटना अध्यक्ष पांडुरंग सरफळे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, उपाध्यक्ष गायकवाड, सचिव सुरेश मोरे, खजिनदार प्रकाश पाटील, चंद्रशेखर गुंड, मंगेश जोशी, नंदकुमार भादेकर, संजीवनी कडवेकर, अक्षदा साखलळकर, अनुराधा धुमाळ आदी उपस्थित होते. यावेळी वयाची 80 वर्ष पूर्ण झालेले डॉ. श्रीनिवास वेदक, महमद डबीर, प्रमोदींनी शिंदे, गुणाजी राजीवले, प्रवीण शाहा, युसूफ रोहावाला अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांना तसेच रांगोळीची जगातील नोंद झालेले रुपेश कर्णेकर व समाजसेवक बिलाल मोरबेकर यांना गौरविण्यात आले. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक मारुती पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक म्हणजे संयम, अनुभव, मार्गदर्शन व चांगले-वाईटचे ज्ञान भांडार आहे. समोर ज्येष्ठ नागरिकांमध्ये माझे आईवडील दिसतात. ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी चांगले कायदे आहेत. आपण आपल्या आई-वडिलांना देवता सारखे माना. सध्याची पिढी मोबाईलमध्ये दंग असते. त्यामुळे पिढी भरकट चालली आहे. मात्र, माझ्या पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक जेष्ठ नागरिकांचा सन्मान केला जाईल, असे वक्तव्य पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले.
1 ऑक्टोबर हा जागतिक वृद्ध दिन जगभर साजरा केला जातो. वृद्ध व्यक्तींना वाढत्या वयोमानामुळे जीवन जगताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना सूरक्षित व सन्मानाने जगता यावे म्हणून केंद्र सरकारने 1999 साली धोरण जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक राज्यांनी त्यांचा वार्षिक अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी. आर्थिक तरतूद नसल्याने वृद्धांना अनेक सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे.
पांडुरंग सरफळे,
अध्यक्ष, जेष्ठ नागरिक मंडळ







