भारताच्या मुख्य प्रशिक्षकांचे ‘गंभीर’ संकेत
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेटमधील दोन महान खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अवघ्या 10 महिन्यांत टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर, विराट आणि रोहित एकदिवसीय क्रिकेटलाही निरोप देणार आहेत का, असे प्रश्न सतत उपस्थित होत आहेत. यासोबतच, भारतीय क्रिकेट चाहत्यांना ही शक्यताही रोमांचित करत आहे की, विराट आणि रोहित 2027 चा एकदिवसीय विश्वचषक खेळू शकतात. यावर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी अजूनही 2 वर्षांपेक्षा जास्त वेळ शिल्लक आहे. तसेच, दोन वर्षांनी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या विश्वचषकापूर्वी, भारतीय संघ 9 द्विपक्षीय एकदिवसीय मालिकांमध्ये एकूण 27 सामने खेळणार आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषकात खेळणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल, त्यांनी स्वतः अद्याप या विषयावर कोणतेही विधान जारी केलेले नाही. दुसरीकडे, बीसीसीआयनेही त्यांच्या विश्वचषकात खेळण्याबद्दल काहीही सांगितले नाही; परंतु, एका वृत्तानुसार, बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी लवकरच विराट आणि रोहित यांच्याशी त्यांच्या एकदिवसीय खेळातील भविष्याबद्दल चर्चा करू शकतात.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने निश्चितच त्याचे हेतू स्पष्ट केले आहेत. काही काळापूर्वी गौतम गंभीरला पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या 2027 च्या विश्वचषकात खेळण्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर तो म्हणाला की, सध्या भारताचे लक्ष 2026 च्या टी-20 विश्वचषकावर आहे, जो पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे. 2027चा एकदिवसीय विश्वचषक अजून 2 वर्षे दूर आहे. मी नेहमीच एक गोष्ट सांगितली आहे. जर तुम्ही चांगली कामगिरी करत राहिलात तर निश्चितच विश्वचषक खेळा, असे गंभीरने सांगितले होते. त्यामुळे गंभीरच्या या विधानावरून असे दिसून येते की, जर विराट अन् रोहित सातत्याने चांगली कामगिरी करू शकले तर त्यांना 2027च्या विश्वचषकात खेळण्यास कोणताही आक्षेप राहणार नाही.







