लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?


शरद पवारांनी दिले संकेत
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन सत्तेत येणार्‍या शिवसेना, काँग्रेसबरोबर पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधीत्व करण्याचे काम करेल, याबाबत शंका नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपशी काडीमोड झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. पण यानंतर राजकीय वातावरणात मात्र एकच खळबळ उडाली होती. हे सरकार टिकणार नाही अशी टीका विरोधकांनी केली. पण त्यावर आज शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. हे सरकार हे पाच वर्ष एकत्र काम करेल असा विश्‍वास व्यक्त करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवरही शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणाला पटलं नसतं. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे,’ असं सांगतानाच हे सरकार पुढचे पाच वर्षे टिकणार, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

सहकार्‍यांच्या कष्टानं, जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहेत. जनतेचा विश्‍वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. राजकारणात सतत नव्या नेतृत्वांना संधी दिली पाहिजे. आणि, उत्तम काम करायचं असेल तर पाठीशी उभं राहिलं पाहिजं.
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Exit mobile version