माथेरानला विकासाच्या दिशेने नेणार; आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असले तरी अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळे माथेरान या माझ्या आवडत्या पर्यटन स्थळाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार असल्याची ग्वाही, आ.जयंत पाटील यांनी मंगळवारी (दि. 25) येथे दिली.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा माथेरानमध्ये सुरु केली जाणार आहे. त्याची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील हे मंगळवारी मथेरानमध्ये आले होते. यावेळी त्यांनी विकासाबाबत विविध विकास मुद्यावर सर्व स्थानिक विविध पक्षाच्या नेत्यांसोबत साधकबाधक चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीस तथा माथेरान नागरी पतसंस्था सभापती अजय सावंत, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज खेडकर, भाजपचे प्रदीप घावरे उपस्थित होते.

माथेरानमध्ये सहकार क्षेत्राचा अभाव आहे म्हणून आम्ही रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे सुरु करणार आहोत. येथील डोंगरदर्‍यांमध्ये व्यवसाय करण्यार्‍या छोटे व्यापारी यांना कशाप्रकारे उन्नती करता येईल या उद्देशाने बँकेची उभारणी करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

माथेरानमध्ये एकच राष्ट्रीयकृत बँक असून नेटवर्कमुळे बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प पडतात यासाठी येथील नेटवर्क चांगल्या प्रकारे चालेल याकडे लक्ष देऊन विधान परिषदेमध्ये हा विषय उचलून धरणार आहे. असेही ते म्हणाले.

माथेरान मध्ये सध्या 5 ते 10 हजार पर्यटक येतात. ते एक लाख कसे होतील अशा पद्धतीचे दळणवळण करण्याकडे माझा पाठपुरावा असेल तसेच क्रांतिकारकांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेला रायगड जिल्हा बँकेकडून आर्थिक मदत करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. रायगड जिल्हा बँकेकडून गोरगरीब आदिवासी बांधवांना व्यवासायिक शिक्षण देणार तसेच बचत गट यांचे फॅब्रिकेशन करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी भेटीदरम्यान सांगितले.

माथेरानच्या विकासाला महत्वपूर्ण चालना मिळणार आहे. येथील आदिवासींना व्यावसायिक प्रशिक्षण, बचत गट यांचे फॅब्रिकेशन होईल याकडे माझा कल असणार आहे. तसेच इंटरनेटसाठी विधानपरिषदेत आवाज उठविणार आहे. माथेरामध्ये आरडीसी उभारणीसाठी नाबार्ड व आरबीआई यांना प्रस्ताव पाठविला आहे.1984 साली शेकापक्षाने लोकांना सक्षम करण्यासाठी माथेरान मध्ये जे काम केले होते तशाच पद्धतीचे काम पुन्हा पर्यटनस्थळी करणार आहे.

जयंत पाटील, आमदार

आ. जयंत पाटील यांनी भेट देऊन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काही दिवसात माथेरान मध्ये सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. ही माथेरानकरांसाठी दीपावली भेट आहे. येथील जनतेला आर्थिक सक्षम करण्यासाठी शेकाप यापूर्वीही जोमाने काम करीत होता आणि करत आहे.

शाफिक शेख, शहरचिटणीस
Exit mobile version