| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचे सत्र वाढत आहे. या अपघातांमध्ये जखमी होण्याबरोबरच मृत्यूदेखील होत असून, अनेकांना कायमचे अपंगत्व निर्माण होत आहे. या खड्ड्यांमुळे दीड वर्षात सुमारे तीनशेहून अधिक जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाही खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनासह शासना अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी खड्ड्यांविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे. मंगळवारी (दि.7) पेझारी चेक पोस्ट येथे पक्षाच्यावतीने रास्ता रोको केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अलिबागमध्ये सोमवारी (दि.6) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील व नागेश कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या अखत्यारित सुमारे 5 हजार किलो मीटर रस्ते आहेत. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातांचा विकास केला जातो. परंतु, जिल्ह्यातील 3 हजार किलो मीटरच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीकडून 2023-24 मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला रस्त्याच्या 316 कामांसाठी 40 कोटी 71 लाख रुपयांची प्रशासकिय मान्यता दिली होती. त्यापैकी 38 कोटी 12 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र, जून 2024 अखरेपर्यंत बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीसह नुतनीकरणासाठी फक्त 16 कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. गतवर्षी करोडो रुपये खर्च करूनही रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे केलेला सर्व खर्च पाण्यात गेला आहे. या वर्षी शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषद सेस फंडातून प्रत्येक तालुक्यासाठी 5 लाख प्रमाणे 75 लाख रुपये जिल्हा परिषद बांधकाम विभागाला देण्यात आले. परंतु, ग्रामीण भागातील कोणत्या रस्त्याची दुरुस्ती केली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारा अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरूड व अलिबाग-रेवस या रस्त्यांची अवस्था देखील दयनीय आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली लाखो करोडोचा भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जात आहे.
विकासाच्या नावाखाली खोदून ठेवलेले रस्तेच गायब झाले आहेत. गणेशोत्सवासह नवरात्रौत्सवही खड्ड्यातून गेला. मात्र, याकडे विद्यमान आमदारांनी जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले आहे. सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्ते चांगले करतील या विश्वासाने आमदारांना निवडून दिले. परंतु, त्यांनी नागरिकांची मोठी घोर निराशा केली आहे. टक्केवारी घेण्यात आमदार मशगूल आहेत. मात्र, विकास फक्त कागदावरच, अशी परिस्थिती आहे. खड्डे चुकविताना अनेक अपघात झाले. या अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. प्रशासनासह शासनाला याबाबत काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही मनमानी शेकाप कदापी सहन करणार नाही. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी कामगार पक्ष कायमच पुढे आला आहे. आता सर्वसामान्यांना चांगले रस्ते मिळावे, खड्डेमय रस्त्यांविरोधात शेकाप मार्फत एल्गार पुकारला जाणार आहे. रस्त्यावर उतरून, चक्का जाम करून प्रशासनासह शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिली आहे.
खड्ड्यांमुळे पर्यटनावर परिणाम
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा, नागांव, वरसोली, अलिबाग शहर तसेच मुरूड तालुक्यातील काशीद, मुरूड शहर, बोर्ली हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे आहेत. लाखो पर्यटक या पर्यटन स्थळी येतात. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. परंतु, खड्डेमय रस्त्यांमुळे पर्यटकांची पर्यटनस्थळांकडे पाठ फिरू लागली आहे. अलिबाग-पेण, अलिबाग-रोहा आणि अलिबाग मुरूड मार्गावरील प्रवास ‘नको रे बाब', अशी परिस्थित पर्यटकांची झाली आहे. स्थानिकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होत आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.







