| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अतिवृष्टीमध्ये हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन सणासुदीमध्ये शेतकरी चिंताग्रस्त झाले असताना सत्ताधारी मात्र निवडणूकीत मशगूल असल्याचे चित्र आहे. खड्डेमय रस्ते, भरमसाठ वीज बिल अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासन व शासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार असा इशारा शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी दिला.
अलिबाग तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेती पाण्यात बुडाली आहे. नारळ व सुपारीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. अनेक घरांची पायाभरणी खचली आहे. शेतकऱ्यांची उपजीविकाच धोक्यात आली असून, सणासुदीच्या काळात त्यांच्या घरात आनंदाऐवजी चिंता आणि हताशा दिसून येत आहे. या परिस्थितीत सरकारने कोट्यावधींच्या पॅकेजेस जाहीर केले असले तरी त्याचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खिशात पोहोचलेला नाही. कागदोपत्री आकडे मांडले जात असले तरी तहसील कार्यालय, बँका आणि अधिकाऱ्यांच्या सहीच्या प्रतीक्षेत थकल्याचे वास्तव समोर येत आहे.
याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी तीव्र शब्दांत भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणजे शेकापच आहे. नेहमीच रस्त्यावर उतरून, प्रशासनाला वठणीवर आणून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला आहे. आज अलिबाग तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था, पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान, रेवस सारख्या गावात नळांना येणारे चिखलमिश्रित पाणी आणि ज्यादा वीज बिल या समस्यांनी जनता हैराण झाली आहे. पण सत्ताधारी मात्र निवडणुकीत मशगुल आहेत. सुरेश घरत यांनी पुढे म्हटले की, शेकापवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या कामगिरीचा हिशेब जनतेला द्यावा. शेतकरी रडतोय, कामगार अडचणीत आहे, जनतेला पायाभूत सुविधा नाहीत. अशा वेळी सत्ताधाऱ्यांनी तोंड का उघडत नाही? शेकाप पक्ष पूर्वीही शेतकऱ्याच्या पाठीशी होता, आजही आहे आणि उद्याही राहणार असे मत सुरेश घरत यांनी व्यक्त केले. शेतकरी, नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत, अन्यथा तीव्र भूमिका घेऊन रस्त्यावर उतरले जाईल असा इशारा यावेळी सुरेश घरत यांनी दिला.
शेतकऱ्यांसह जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार: सुरेश घरत
