विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मिळणार नोकर्‍या?

उच्च पदावर नोकर्‍या देण्याची बबन पाटील यांची मागणी
। उरण । प्रतिनिधी ।
नवी मुंबई विमानतळावर होत असलेल्या कामांसह याठिकाणी उच्च पदावरील होणार्‍या नियुक्त्यांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सामावून घेण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये वैमानिक, टेक्निकल विभागातील अद्ययावत प्रशिक्षण त्यांना मिळावे, यासाठी पनवेल उरण परिसरातील मुलांसाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी बबन पाटील यांनी केली आहे.

नव्याने होवू घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या मुलांना उच्च पदावर नोकर्‍या देण्यासाठी तशा आशयाची अद्ययावत प्रशिक्षण केंद्रे उभारण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आ. मनोहर भोईर, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार तथा स्व. दि. बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत चंदू पाटील हे देखील उपस्थित होते.

स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच सदर ठिकाणी होत असलेल्या विमानतळावर विविध प्रकारच्या नोकर्‍या निर्माण होणार असून प्रकल्पग्रस्त तरुणांना त्यासाठी लागणारी कार्यकुशलता प्राप्त करता यावी म्हणून अद्ययावत प्रशिक्षण केंद्र येथे उभारण्याची खर्‍या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध असणे ही प्रचंड गरज असून त्यांचा तो हक्क आहे, त्यासाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.

इथला स्थानिक भूमिपुत्र कार्यकुशल झाल्यास तो इथे भविष्यात निर्माण होणार्‍या विमानतळ प्रकल्पामध्ये निर्माण होत असलेल्या रोजगारांसाठी सक्षम होऊ शकतो. म्हणून लवकरात लवकर अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी सिडकोकडे करण्यात आली आहे. या मागणीनुसार हे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास येथील स्थानिक भूमिपुत्र तरुणांना त्याचा नक्कीच फायदा होईल, असे मत यावेळी बबन पाटील यांनी व्यक्त केले.

Exit mobile version