दिवाळीनंतरच फुटणार निवडणुकीचा बार?

आगामी विधानसभेसाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू

| मुंबई | प्रतिनिधी |

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पण, निवडणूक कधी होणार हे अजून कळालेले नाही. परंतु, राज्यातील सर्वच पक्षांनी निवडणुकीआधी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच निवडणूक होणार की दिवाळीनंतर राज्यात नवे सरकार स्थापन होणार यावर अनेक अंदाज बांधले जात आहे.

महाराष्ट्राच्या सरकारचा कार्यकाळ 27 नोव्हेंबरला संपतोय. त्यामुळे 27 नोव्हेंबरपूर्वी राज्यात नवीन सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर 45 दिवसांनी नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता असते. निवडणूक आयोगाने जर नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले, तर 12 ऑक्टोबरला राज्यातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 45 दिवस लागले तर 27 नोव्हेंबरपर्यंत राज्याला नवीन सरकार मिळू शकते. ऑक्टोबरमध्ये निवडणूक होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण त्यासाठी सप्टेंबरमध्येच निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागेल. पण, अजूनही पावसाचा हंगाम संपलेला नाही, आणि निवडणूक आयोगाकडून तशा हालचाली दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये राज्याची निवडणूक होणार नाही, असेही सांगितले जात आहे.

Exit mobile version