टोरंट प्रकल्पावर स्थानिकांचा सवाल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पेज नदीवरील साई डोंगर परिसरात टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रा.लि. या कंपनीकडून प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पामुळे प्रभू श्रीराम आणि पांडवांशी संबंधित मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक व धार्मिक पाऊलखुणा पाण्याखाली जाण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी पप्पू देशमुख यांनी सरकारला सवाल उपस्थित केला आहे की, जय श्रीरामच्या घोषणा देत सत्तेवर आलेले सरकार प्रभू श्रीरामांच्या पाऊलखुणाच नष्ट होऊ देणार का?
पाली तर्फे कोतवाल-खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील साई डोंगर परिसरात हा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित असून, त्याला स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत आहे. स्थानिकांच्या मते, पेज नदी परिसराशी प्रभू श्रीराम आणि पांडवांच्या वास्तव्याची आख्यायिका जोडलेली आहे. वनवास काळात प्रभू श्रीराम या मार्गाने गेले होते, अशी स्थानिकांची श्रद्धा असून, नदीपात्रातील खडकांवर त्यांच्या पाऊलखुणा आजही असल्याचा दावा ग्रामस्थ करतात.
मोहमाळवाडीच्या मागील भागात नदीपात्रात रथ गेल्याचे चिन्ह म्हणून मोठा चर असल्याचेही सांगितले जाते. याशिवाय, पूर्वी खडकांवर प्रभू श्रीराम व पांडवांची नावे कोरलेली होती. कालांतराने ती अस्पष्ट झाली असली तरी पाऊलखुणा अद्याप अस्तित्वात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या पाऊलखुणांना आदिवासी समाजासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. येथे नियमितपणे फुले, अबीर-गुलाल अर्पण करून पूजा केली जाते. मात्र, प्रस्तावित धरणामुळे हा संपूर्ण परिसर पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने धार्मिक वारसा आणि पर्यावरण या दोन्हींचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पर्यावरणप्रेमींच्या मते, या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल, जैवविविधता आणि स्थानिकांचा सांस्कृतिक वारसा धोक्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने विकासासोबतच धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पेज नदी परिसरातील प्रभू श्रीराम आणि पांडवांच्या पाऊलखुणा अनेक दशकांपासून स्थानिकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. विकासाच्या नावाखाली सरकारने हा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा नष्ट करू नये. आमच्या श्रद्धास्थानाला धोका निर्माण झाला, तर स्थानिक नागरिक शांत बसणार नाहीत आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल.
पप्पू देशमुख
(स्थानिक पर्यावरणप्रेमी)
