कोरोनाची चौथी लाट येणार? दैनंदिन रुग्णसंख्या 700 च्या वर

। मुंबई । वार्ताहर ।
देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली असून उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अशातच मुंबईत चौथी लाट येणार तर नाही ना? अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच आहे. मुंबईतील दैनंदिन कोविड रुग्णसंख्या 700 पार पोहोचली आहे. मुंबईतील गोरेगाव भागांत रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे. सध्या गोरेगावमधील रुग्णसंख्या वाढीचा दर 0.086 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या मुंबईत आहे. मुंबईत सध्या 3735 सक्रीय रुग्ण आहेत. राज्याच्या 60 टक्के सक्रीय रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. ठाणे 658, रायगड 108 आणि पुण्यात 409 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत काल (शुक्रवारी) 763 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर काल दिवसभरात 352 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1576 दिवसांवर पोहोचला आहे. याशिवाय, ठाणे मनपा 77, नवी मुंबई 71, पुणे मनपा 72 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Exit mobile version