| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या टोरंट वीज प्रकल्पाला प्रचंड विरोध होत आहे. तरीदेखील देशाचे पंतप्रधान येणारच, अशी आवई उठवली जात आहे. पंतप्रधान आले तर त्यांची सभा ज्या लाखाची वाडी येथे आयोजित केली जाऊ शकते तेथे आजही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आदिवसी शेतकऱ्यांची सातबारा उतारा असलेली जमीन हस्तगत केल्याचे त्यांच्याकडून बोलले जात असून, बंदोबस्तात असलेले पोलीस त्यांना तेथून हाकलून लावत असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
टोरंट वीज प्रकल्पाच्या वसाहतीसाठी महाराष्ट्र्र शासनाने आदिवासी सोसायटीच्या नावे असलेली 96 एकर जमीन टोरंट कंपनीला 30 वर्षाच्या भाडेतत्वावर दिली आहे. त्या भालिवडी ग्रामपंचायत मधील जमिनीवर ऑक्टोबर महिन्यापासून जमीन सपाटीकरण सुरु आहे.त्यांनतर 15 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान टोरंट कंपनीच्या सायडोंगर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी येणार अशी चर्चा सुरु झाली. तेव्हापासून कर्जत पोलिसांचे पथक तलाखाची वाडी येथे बंदोबस्तात आहे. सुरुवातीला दि.3 नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान यांचा कार्यक्रम नक्की होता; मात्र, दसऱ्याला पाली सायडोंगर येथे झाडे तोडली आणि त्यानंतर देशभरातून टीका झाली. त्यामुळे ती तारीख पुढे ढकलून दि.16 नॉव्हेमबर करण्यात आली. परंतु, या दिवशी देखील पंतप्रधान काही आले नाहीत. आता डिसेंबर महिन्यात पंतप्रधान येणार असल्याची अनौपचारिक चर्चा येथे बंदोबस्तात असलेले पोलीस करीत आहेत. त्यामुळे तेथे पोलिसांचा जगता पहारा कायम राहणार आहे. त्याचा त्रास सावळे ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. या परिसराच्या आजूबाजूला त्यांच्या शेतजमिनी आहेत. त्यांना त्या जमिनीमध्ये जाण्यास देखील पोलीस विरोध करीत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.






