। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात वाढत्या ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादणार का? असा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात मोठं विधान केलं आहे. राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाही, असं स्पष्ट मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. तसेच केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनमुळे 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणाला स्थगिती देण्यात आलीय. महाराष्ट्रात उड्डाणाबाबत केंद्र सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं. ते जालन्यात बोलत होते.
केंद्रीय औषध मानक तज्ज्ञ संस्थेची शुक्रवारी (10 डिसेंबर) बैठक झाली. या बैठकीत फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर देण्यासाठी या संस्थेने भूमिका घ्यावी, अशी मागणीही टोपे यांनी केली. परदेशातून आलेले अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांना शोधण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेतली जात असून कोणत्याही परिस्थितीत या लोकांना शोधून त्यांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. सांगलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेला 1 रुग्ण दगावला आहे. या रुग्णाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याच्या चाचणीचा नमुना जिनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत विचारलं असता याबाबत जिनोमिक सिक्वेंसिंग अहवाल आल्यानंतरच बोलता येईल अशी माहिती टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात संसर्गाचं प्रमाण वाढलं
परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधू आणि त्यांच्या चाचण्या करू. महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तींकडून कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मात्र, नागरिकांनी लसीकरण तातडीनं करून घ्यावे. कोरोना नियमांचं पालन करावे असंही ते म्हणाले.
परदेशातून आलेल्यांना शोधून जिनोमिक सिक्वेंसिंग चाचणी
राज्यात सध्या कोरोना संक्रमित व्यक्तींना आपण विलीगिकरण करत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आपण ट्रॅकिंग, टेस्टिंग केली जात आहे. जे लोक 2 महिन्यांपूर्वी राज्यात विदेशातून आलेले आहेत त्यांना शोधून त्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवले जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं.