पोलादपूरच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार- आ. जयंत पाटील

। पोलादपूर । शैलेश पालकर ।
दक्षिण आफ्रिका खंडातील देश हजारो एकर जमिनी विनाशुल्क शेतीसाठी देत असल्याने तेथील एका देशात सूर्यफुलाची शेती करून 8 कोटी रुपयांचे उत्पन्न यावर्षी घेतले. पोलादपूर तालुक्याच्या डोंगर-दर्‍यांची आठवण तेथील वातावरणात येते. पोलादपूर तालुक्यातील जमिनींचा वापर करून अशाप्रकारचे कृषी उत्पादन मोठया प्रमाणावर घेऊन शेतकर्‍यांना सधन करता येईल. पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वपक्षिय एकत्र आल्यास दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर नियोजनबध्द प्रयत्न करू, अशी ग्वाही रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस अ. जयंत पाटील यांनी दिली. बँकेच्या विन्हेरे नागांव येथील स्वमालकीच्या विशेष कक्ष शाखेचे उद्घाटन आटोपून स्वमालकीच्या सुसज्ज इमारतीमध्ये पोलादपूर शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आले असता आ.जयंत पाटील बोलत होते.

याप्रसंगी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत जगताप, पोलादपूरच्या नगराध्यक्षा सोनल गायकवाड, माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे व सुमन कुंभार, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेंद्र खैरे, संचालक एकनाथ गायकवाड, महाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे वैभव चांदे व श्रीधर सकपाळ, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, विन्हेरे विशेष कक्ष नागाव शाखाधिकारी नितीन चांदोरकर, पोलादपूर शाखाधिकारी संजीव जगताप, बिरवाडी शाखाधिकारी दिलीप तांबे आणि माणगाव विभागीय अधिकारी संजीव देशमुख आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

पोलादपूर शहराच्या अंडरपास महामार्गामुळे जर तालुक्याचे नुकसान झाले असेल तर पोलादपूर शहरात महामार्गाच्या वरील भागात मोठया प्रकारचा व्यापारी व्यावसायिक उपक्रम राबवून कोकणाकडे जाणार्‍या प्रवाशांना आणि वाहनांना सर्व्हिसरोडवरून जाण्यासाठी आकर्षित करता येईल. नगरपंचायतीच्या हद्दीतील जागा मिळाल्यास तिथेही रायगड बाजारसारखा भव्य प्रकल्प उभारता येईल, असे सांगून आ.जयंत पाटील यांनी पोलादपूर तालुक्यासाठी सर्वाधिक विकासकामे पाटील परिवाराने केली असल्याचे सांगितले. नारायण नागू पाटील यांच्यानंतर आमची पाचवी पिढी आज राजकारणात लक्ष्यवेधी आणि प्रभावी मांडणी करून जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिली आहे. पुर्वी काँग्रेस आणि प्रजा समाजवादी अशी विचारसरणीचे लोक महाड व पोलादपूर या दोन तालुक्यात आपआपल्या विचारसरणीचे जतन करीत ठाम होते. आता कोणत्या पक्षात आहात, हे विचारावे लागते, अशी खंत व्यक्त केली.

कुडपण, उमरठ, रायगड किल्ला आणि प्रतापगडावरही त्याकाळी बांधकाम सभापती असलेल्या स्व. प्रभाकर पाटील यांचे काम दिसून येते. त्यांच्यामागे शांताराम फिलसे या अर्थतज्ज्ञ स्वरूपाच्या सहकार्‍यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. रायगड जिल्हा परिषदेवर सेवेचे ठायी तत्पर-पाटील प्रभाकर हा उल्लेख प्रवेशद्वारावर लिहिण्यामागे स्व.शांताराम भाऊंनी प्रभाकर पाटील यांचे कार्य जनमानसामान्यांपर्यत पोहोचावे, या हेतूने केला. प्रशासनावर पकड असल्यास राजकारण्यांना कसलीही अडचण येत नाही. बॅ.अंतुले यांनी मुख्यमंत्री असताना राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांना दालनात बोलावून एकेकाला तातडीने काय अपेक्षित आहे, हे विचारले असता प्रभाकर पाटील यांनी कुलाबाचे रायगड नामांतर करण्याची सुचना केली. बॅ.अंतुले यांनी तात्काळ राज्याच्या मुख्य सचिवांना बोलावून तसा अध्यादेश पारित करण्यास भाग पाडले. अफझलखानाची कबर आता पाडली असली तरी छ.शिवाजी महाराजांनी ती बांधली असल्याने तत्कालीन कुलाबा जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती म्हणून प्रभाकर पाटील यांनी तेथे अत्तराचे दिवे लावण्याकामी लक्ष दिले होते.

यावेळी आ.जयंतभाई पाटील यांच्याहस्ते ठेवीदारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ.जयंत पाटील यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष अजय सलागरे, नगरपंचायतीचे विरोधीपक्षनेते दिलीप भागवत, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश अहिरे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी संचालक बाळाराम मोरे, महाडचे काँग्रेस सरचिटणीस देशमुख, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका महिला संघटीका अश्‍विनी गांधी तसेच सर्वपक्षियांनी उपस्थिती दर्शविली.

शेकापने केलेल्या विकासकामांचे विस्मरण
शिवराजधानी किल्ले रायगडावरील समाधीस्थळाजवळील गार्डन असो अथवा विविध विकासकामे, प्रभाकर पाटील यांनी विशेष लक्ष देऊन सुविधा केल्या. छ.शिवाजी महाराजांना पोलीसांमार्फत दर आठवडयाला सलामी देण्यासाठी बॅ.अंतुले मुख्यमंत्री असताना प्रभाकर पाटील यांनीच यशस्वी पाठपुरावा केला होता. मात्र, आता या योगदानाबद्दल जनतेमध्ये काहीही वाच्यता होत नाही. परिणामी, केवळ व्यक्ती नव्हे तर एखाद्या पक्षाने केलेल्या उल्लेखनीय विकासकामांचे विस्मरण जनतेला होत असल्याच्या वेदना यावेळी आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या.

टक्केवारी, बदल्यांची कामे करीत नाही
पोलादपूर तालुक्यातील सवाद आणि कापडे तसेच महाड तालुक्यातील वरंध येथेही रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा उघडण्याचे प्रस्ताव असल्याने त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.जयंत पाटील यांनी सांगितले. पुर्वी 1600 कर्मचारी असताना केवळ 30 शाखा होत्या आणि आपण कर्मचारी संख्या कमी करून शाखांची संख्या वाढवल्याने ग्राहकसेवेला प्राधान्य देण्याची मानसिकता कर्मचारीवर्गात रूजली असल्याचे सांगून कोणतीही संस्था आपली खासगी मालमत्ता समजून त्याद्वारे ग्राहकसेवा केल्यास खर्च मर्यादित ठेवता येतात. आपण चेअरमन म्हणून बँकेची गाडी वापरत नसून विधानपरिषदेचे ज्येष्ठ सदस्य असूनही आमदारकीचे वेतन घेत नाही. सरकारी कार्यक्रमांमध्ये जेवण घेत नाही. टक्केवारी आणि बदल्यांची कामे आपण करीत नाही, असे सांगून आचरण स्वच्छ ठेवल्याने प्रशासनामध्येदेखील आपला दबदबा राहतो, असे सांगितले. पूर्वी पालकमंत्री आपणाशी चर्चा करून जिल्हा नियोजनाची बैठक घेत असत. अगदी पतंगराव कदमांनीही अनेकदा फोन करून अशा बैठकींबाबत पूर्वचर्चा केली. मात्र, मागच्या पालकमंत्र्यांना तसे कधीच करावेसे वाटले नव्हते, याचे आश्‍चर्य वाटत असल्याचे यावेळी आ.जयंत पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version