| कोलाड | वार्ताहर |
समाजकारण व राजकारणात पुढे जात असताना आपल्या भागातील, परिसरातील, घरातील लोकांची ताकद महत्त्वाची आहे. तुमची ताकद माझ्या पाठीशी असल्याने मला चांगली संधी सातत्याने राजकारणात व समाजकारणात मिळत आहे. तुमची प्रेरणा व ताकद घेत माझ्या पदाचा फायदा लोकांसाठी करणार आहे. शामराव पेजे महामंडळावर काम करत असताना रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण व महिलांसाठी या महामंडळातून फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी काम करत असताना माझे लोक व विरोधक असा कधीही भेदभाव करत नसल्याचे सुरेश मगर यांनी सांगितले.
ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत शामराव पेजे कोकण व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अशासकीय संचालक मंडळावर निवड झाल्यावर शिवसमर्थनगर महादेववाडी यांच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमप्रसंगी सुरेश मगर बोलत होते. यावेळी ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका सरचिटणीस महादेव सरसंबे, लोकशाहीर अनंत मगर, कोळी समाज नेते नवनीतदादा डोलकर, उपसरपंच अरविंद मगर, ग्रामपंचायत सदस्य सचिन सुतार व असंख्य नागरिक उपस्थित होते.