। चिरनेर । प्रतिनिधी ।
हुकूमशाही पद्धतीच्या राजवटीला उलथून टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी कार्यकर्त्यांना केले.
मावळ व रायगड लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचारासंदर्भात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक व पत्रकार परिषद शेलघर येथील समाज मंदिर हॉल येथे घेण्यात आली होती. त्यावेळी घरत हे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, काँग्रेसच्या रायगड महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, महिला तालुका अध्यक्षा रेखा घरत आदी उपस्थित होते.
महेंद्र घरत म्हणाले की, देशामध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आहे. हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे.त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा जनताच दाखवील असा विश्वास महेंद्र घरत यांनी व्यक्त केला. गलिच्छ राजकारणाविरोधात ही लढाई आहे. महायुतीचा पराभव घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी निष्ठेने कामाला लागावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.