वृक्षतोडमुळे झाडांची संख्या कमी; आरोग्यासाठी ही फळे खाणे आवश्यक
| माणगाव | प्रतिनिधी |
हिवाळा नुकताच सुरू झाला असून, हिवाळी दिवसांत रानावनात होणाऱ्या रान फळांना बहर येण्यास सुरूवात झाली आहे. हिवाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते गुलाबी थंडीचे आणि या थंडीच्या दिवसात खायला मिळणाऱ्या विविध रान फळांचे नुकतीच थंडीला सुरुवात झाली असून, खास हिवाळ्यातील रानफळांचे आगमन सुरू झाले आहे.
उन्हाळ्यात ज्याप्रमाणे रानावनात आंबे, जांभूळ, काजू इत्यादी रानफळे खावयास मिळतात. तसेच खास हिवाळी दिवसातही विविध प्रकारच्या रानफळांना बहर येत असतो. यामध्ये बोंडे, आवळा, बोरे, चिंच आदी फळांचा समावेश होतो. चवीला गोड नसणारी आंबट, तुरट वर्गात मोडणारी ही फळे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे सर्वांसाठी खास आकर्षणाचा भाग आहेत. पावसाळा संपल्यानंतर सुरू होणाऱ्या थंडीच्या मोसमातील पौष्टिक व आरोग्यवर्धक फळे म्हणून ही फळे प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यानंतरच्या वाढणाऱ्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर व थंडीच्या मोसमात ही फळे तयार होतात.
हिवाळ्यात तयार होणारी बोंडे ही तुरट-राकट चवीसाठी प्रसिद्ध आहेत. हिवाळ्यातील थंडीचे हे दिवस रान बोरांसाठी प्रसिद्ध आहेत. काटेरी अशा बोरीच्या झाडांवर आढळणारी बोरे पक्व होण्यास सुरुवात झाली असून, बाजारात पाच ते दहा रुपयांना पुरचुंडीमध्ये ती विकली जात आहेत. कोकणातील रानावणात होणारी ही बोरे खास वाळवून मीठ लावून उन्हाळी दिवसांसाठी ही ठेवली जातात. या ‘बी’मध्ये असणारे गरही खास खाण्यासाठी चविष्ट असतात. लहान मुले आवर्जून हे गर फोडून खातात. खाडी पट्ट्यातील टपोऱ्या बोरांचे खवय्यांना खास आकर्षण असते. बोरा प्रमाणेच या दिवसात आंबट-चिंबट अशा चिंचांचा मोसम सुरू झाला आहे. याच दिवसातील चिंचांचा स्वाद घेणे, मिठासोबत खाणे अनेक जण पसंत करतात. चिंचेचा कोळ तयार करणे चिंचोके तयार करणे इत्यादी कामे या दिवसात
घरोघरी केली जातात. या उद्योगातून अनेक कुटुंबांना अर्थाजनही प्राप्त होत आहे. दहा ते पंधरा रुपये वाटा याप्रमाणे या चिंचा विकल्या जात आहेत.
बोरी चिंचाप्रमाणे बाजारात आवळा उपलब्ध झाली आहेत. यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व देणारी आवळे शंभर ते दीडशे रुपये किलो प्रमाणे बाजारात विकले जात आहेत. आवळ्याचा पेठा, लोणचं, चवनप्राश इत्यादी बनविण्याकडे गृहिणीनी पसंत दिली आहे. हिवाळी दिवसात रानात मिळणारे व सर्वांच्या पसंतीस उतरणारे फळ म्हणजे बोंडे होत. बोंडीच्या झाडावर हिवाळी दिवसात होणारे हे फळ खायला तुरट-राकट असते. जंगलातील वनवे आणि वृक्षतोड यामुळे या रानमेवांच्या झाडांची संख्या कमी होत असली तरी या रान फळांचा गोडवा आणि चव खवय्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत असते.
