अलिबागमधील विद्यानगर परिसरातील घटना
| अलिबाग | प्रतिनिधी |
विद्युत खांबावर चढून काम करत असताना कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला. त्यामध्येच त्याचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना विद्यानगर परिसरातील सिगल सोसायटीजवळ घडली. या घटनेने कर्मचारी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूरज मिसाळ असे या वायरमनचे नाव असून, तो सुतारपाडा येथील रहिवासी आहे. सिगल सोसायटीसमोर असलेल्या विद्युत खांबावर चढून तो व त्याचा सहकारी मंगळवारी सायंकाळी काम करीत होता. अचानक दोघांना विजेचा झटका बसला. त्यामध्ये सूरजला गंभीर दुखापत झाल्याने तो जागेवरच मृत पावल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली. या घटनेत सूरजचा सहकारी सुदैवाने बचावला.





