राज्यसभेच्या निवडणुकीतून छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी माघार घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द मोडल्याचा आरोप केला. संभाजीराजे गेल्या वेळी भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झाले. पण ते त्या पक्षात गेले नाहीत. भाजप तसेच नरेंद्र मोदी यांच्यापासून त्यांनी एक सुरक्षित अंतर ठेवले. त्यामुळेच भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. राजेंनी मग शिवसेनेला गळ घातली. सेनेने यांना पक्षात आलात तरच उमेदवारी देऊ असे सांगितले. राजे बहुदा स्वतःला सर्वांच्या वर मानत असल्याने त्यांना कोणत्याच पक्षाचा टिळा नको असावा. तेही समजण्यासारखे आहे. महाराजांच्या स्मारकापुढे जाऊन शपथ घेऊन उद्धव यांनी सांगावे की आपण शब्द दिला नव्हता अशी भावनात्मक भाषा राजे यांनी शुक्रवारी केली. म्हणजे, यांना खासदारकी हवी आहे, राजकारण्यांचा पाठिंबाही हवा आहे, पण त्यांच्या अटी मात्र नकोत असा हा सगळा मामला आहे. राजे यांच्या या खटपटीला बाहेरून कपडे सांभाळणारे भाजपवाले फारच जोरजोराने प्रोत्साहन देत होते. कदाचित अमित शहांनी मुख्यमंत्रिपद देण्याबाबतचा शब्द देऊन नंतर विश्वासघात केला असे ठाकरे नेहमी सांगत असतात. या आरोपाला शह देण्यासाठी यापुढे भाजपवाले राजे यांचा हा आरोप वापरतील, असे दिसते. शिवसेनेने राजे यांना उमेदवारी द्यायला हवी होती असे नक्राश्रू देवेंद्र फडणवीस यांनी परवा पत्रकारांशी बोलताना आढळले. छत्रपतींच्या वारसाला उमेदवारी न देऊन सेनेने जणू महाराष्ट्राचाच अपमान केला आहे असा फडणवीसांचा आविर्भाव आहे. बरोबर आठ वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवानींनाच पंतप्रधान करायला हवे होते असे मनापासून वाटणारे त्यांच्याच पक्षात असंख्य लोक होते. पण अशा बाबतीत ब्र देखील काढण्याची हिंमत नसलेले फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील हे नेते सेनेने कोणाला उमेदवारी द्यावी यावर जे मतप्रदर्शन करताहेत ते मनोरंजक आहे. पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचे हे नवीनच राजकारण भाजपने आता विकसित केलेले दिसते. यापूर्वी राज ठाकरे व नवनीत राणा यांच्या आंदोलनांनाबाबतही भाजपने हेच केले होते. नवनीत राणांना मातोश्रीच्या बाहेर आंदोलन करताना अटक केली गेली तर महाराष्ट्र सरकार हनुमान चालिसाच्या विरोधात आहे असा दुष्प्रचार भाजपने केला. त्याच दरम्यान गुजरातमधील दलित आमदार जिग्नेश मेवानी यांना पंतप्रधानांविरुध्द केवळ एक ट्विट केले म्हणून आसाम पोलिसांनी अडीच हजार किलोमीटरवरून येऊन अटक केली. तिथल्या न्यायालयाने कडक ताशेरे मारून मेवानी यांची सुटका केली. त्याविषयी भाजपवाले बोलायला तयार नाहीत. राज ठाकरे यांना अयोध्येला येऊ देणार नाही अशा धमक्या तिथला भाजपचा एक खासदार खुलेआम आणि आजतागायत देतो आहे. मोदी किंवा आदित्यनाथांनी ठरवलं तर एका मिनिटात राज यांना दिल्या जाणार्या धमक्या बंद होऊ शकतात. पण तसे घडलेले नाही. फडणवीस, पाटील किंवा भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी याबाबत पूर्ण मौन बाळगले आहे. राज ठाकरे यांच्या भोंगाविरोधी आंदोलनाचा भाजपने पूर्ण फायदा उठवला. उत्तर प्रदेशात भोंग्याविरुध्द कारवाई केली गेली व तिचा गाजावाजा केला गेला. पण इतके होऊनही राज यांच्या पारड्यात आपला पूर्ण पाठिंबा टाकण्यास भाजप तयार नाही. मोदी हे सहजासहजी आपल्या टीकाकारांना माफ करत नाहीत, उलट त्यांचा पूर्ण पराभव होईल अशी व्यवस्था करतात. राज यांनी यापूर्वी लाव रे तो व्हिडिओ या मोहिमेच्या वेळी केलेली प्रखर टीका मोदी अजून विसरलेले नसावेत. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज हे शिवसेनेचे मोठे नुकसान करू शकतात. त्यामुळे सध्या महाराष्ट्रापुरते त्यांच्या मोहिमांना भाजपवाले बाहेरून पाठिंबा देत आहेत. अयोध्या दौर्याच्या वेळी आपल्या कार्यकर्त्यांना अडकवण्यासाठी सापळा रचण्यात आला होता हा राज यांचा अजब दावा म्हणजे भाजपच्या राजे प्रकरणातील टीकेचीच दुसरी आवृत्ती होती. त्यात धमकी देणारा खासदार बाजूला पडला आणि कुठल्या तरी फोटोत त्या खासदारासोबत असल्यामुळे शरद पवार यांच्यावरच टीका सुरू झाली. यापूर्वी एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनातही नेमके हेच झाले होते. एकूण, सत्ता येईपर्यंत ही पाहुण्यांची काठी चालतच राहील अशी चिन्हे दिसतात.