। अलिबाग । वार्ताहर ।
ज्यांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष असतो, त्यांचा विजय निश्चित असतो, असे उद्गार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी अलिबागमध्ये झालेल्या आढावा बैठकीत काढले. यावेळी राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 32 रायगड लोकसभा 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहराच्या आढावा बैठकीचे आयोजन अलिबाग गोविंद नगर, डॉ. फुटाणे हॉस्पिटलसमोर, चेंढरे बायपास रोड येथे दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले होते. बैठकीसाठी मोठ्या संखेने शिवसैनिक उपस्थित होते.
तटकरे हे गद्दारच आहेत. पहिले अंतुलेंना फसवलं आणि आता शरद पवारांना फसवले, म्हणून शरद पवारांनीच पक्षप्रमुख उद्धवजींकडे अनंत गीते यांची उमेदवारी मागितली, जेणेकरून ही गद्दारीची घाण नष्ट करता येईल, अनंत गीतेंसारखे सदाचारींची गरज जनतेला आहे, तटकरेंसारखे भ्रष्टाचारींची गरज जनतेला नाही. लोकसभा मतदारसंघाचं गणितच असं आहे; शेतकरी कामगार पक्ष ज्याचा पाठीशी आहे, त्याच पक्षाचा खासदार निवडून येतो. तसेही महाविकास आघाडीमुळे आज शेकाप, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी असे बलाढ्य पक्ष आपल्यासोबत आहेत, त्यामुळे तटकरेंचा भुईसपाट निश्चित होणार, असे जिल्हाप्रमुखांनी भाषणात विरोधकांना खडे बोल सुनावले.
अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, तर अनेक शिवसैनिकांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, युवा जिल्हाध्यक्ष अमिर ठाकूर, तालुका प्रमुख शंकर गुरव, उपजिल्हा संघटक अजित पाटील, विधानसभा संघटक कृष्णा कडवे, अलिबाग प्रवक्ते धनंजय गुरव, तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर व पदाधिकारी उपस्थित होते.