नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी स्वॅप लिव्हर प्रत्यारोपण
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
रक्तगट न जुळल्याने अवयव प्रत्यारोपणात अनेकदा अडचणी निर्माण होतात. अशाच एका प्रकरणात दोन पुरुष रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती, परंतु त्यांच्या पत्नींचे रक्तगट जुळत नव्हते. यावर मार्ग काढत स्वॅप यकृत प्रत्यारोपण म्हणजे दोन्ही रूग्णांच्या बायकांनी आपले यकृत एकमेकांच्या पतीला दान करून पतींचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये हे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
डॉ. शरणकुमार नरुटे (संचालक, यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर) यांच्या नेतृत्वाखालील यकृत रोग, एचपीबी शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण टीमने हे स्वॅप यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले. चिपळूण येथील 53 वर्षीय महेंद्र गमरे आणि नांदेडमध्ये कार्यरत असलेले 41 वर्षीय रुग्ण पवन ठिगळे हे शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराशी झुंजत होते. दोन्ही रुग्णांना कावीळ, जलोदर, अवयवांना सूज येणे, पोट फुगणे, भूक न लागणे आणि स्नायूंची झीज होणे यासारख्या समस्या होत्या. एका वर्षापेक्षा जास्त काळ ते प्रत्यारोपणाची वाट पाहत होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. महेंद्र गमरे यांनी नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये, तर पवन ठिगळे पुण्यातील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.
डॉ शरणकुमार नरुटे यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नी यकृताचा काही भाग दान करण्यास उत्सुक होत्या. परंतु प्राप्तकर्ता आणि दात्याचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर, ते जुळत नसल्याचे दिसून आले. मात्र हे जोडपे स्वॅप प्रत्यारोपणासाठी पात्र ठरले . ज्या रुग्णांच्या कुटुंबात अवयव दात्यांचे रक्तगट जुळत नसल्याने प्रत्यारोपण करण्यात अडचणी येतात, अशा रुग्णांसाठी स्वॅप प्रत्यारोपण हे आशेचा किरण ठरते. यामध्ये दोन रुग्ण ज्यांना एकाच प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते, अशा रुग्णांच्या कुटुंबातच अवयवांची देवाणघेवाण केली जाते. यालाच स्वॅप प्रत्यारोपण असे म्हटले जाते. महेंद्र गमरे यांची पत्नी जुही महेंद्र गमरे हिने तिच्या यकृताचा एक भाग रुग्ण पवन ठिगळे यांना दान केला, तर रुग्ण पवन ठिगळे यांच्या पत्नीने तिच्या यकृताचा भाग रुग्ण महेंद्र गमरे यांना दान केला. दोन दाते आणि दोन प्राप्तकर्त्यांवर एकाच वेळी 10 तासांच्या आत प्रत्यारोपण करण्यात आले. प्राप्तकर्त्यांना 11 दिवसांनी घरी सोडण्यात आले तर दात्यांना 7 दिवसांत घरी सोडण्यात आले.
डॉ. नरुटे पुढे सांगतात की, कुटुंबातील कोणाचाही रक्तगट समान नव्हता. यामुळे यकृत प्रत्यारोपणात विलंब झाला. दोन्ही रुग्ण गंभीररित्या आजारी होते आणि त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते मात्र स्वॅप प्रत्यारोपणामुळे हे प्रत्यारोपण शक्य झाले आणि या रुग्णांचा जीव वाचला. भूल देण्यापासून ते प्रत्यारोपण पूर्ण करण्यापर्यंत चारही शस्त्रक्रिया एकाच वेळी चार ऑपरेटिंग रूम मध्ये करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. दोन्ही रुग्णांना प्रत्यारोपणानंतर एक पोस्टऑपरेटिव्ह कोर्स देण्यात आला आहे.
यकृत प्रत्यारोपणात पात्र दात्यांची नेहमीच कमतरता असते. ज्यामुळे प्रगत यकृत रोग असलेला रुग्ण मृत्यूस बळी पडतो. रक्तगट किंवा यकृताचा आकार जुळत नसल्यामुळे ते त्यांचे यकृत दान करू शकत नाहीत. अशा प्राप्तकर्त्यांसाठी स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट जीवनरक्षक ठरते. चार ऑपरेटिंग रूममध्ये 10 तासांहून अधिक काळ हि अत्यंत आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. अशा शस्त्रक्रियांपूर्वी रुग्णांचे समुपदेशन फार महत्त्वाची भूमिका बजावते.
