| नवी मुंबई | प्रतिनिधी |
पनवेलमध्ये एका अज्ञात महिलेने दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला फुटपाथवर सोडून दिल्याची घटना ताजी असतानाच सीवूडमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली. लोकलमध्ये 15 दिवसांच्या बाळाचा ठेवून आई फरार झाली. हार्बर रेल्वेमार्गावरील सीवूड्स स्थानकात मंगळवारी (दि.1) दुपारी एक वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जुईनगरमध्ये राहणारी दिव्या नायडू (19) आणि तिची मैत्रीण भूमिका माने चेंबूरहून घरी जात होत्या. ही महिला सानपाडा रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढली. सीवूड्स स्थानकावर मला उतरायचे असल्याचे सांगून या महिलेने आपल्याकडे बाळ आणि सामान असल्याने उतरताना मदत करावी अशी विनंती दोन तरुणींकडे केली. त्या दोघी जुईनगर येथे न उतरता महिलेला मदत म्हणून सिवूड स्थानकावर खाली उतरल्या. सीवूडला उतरताना महिलेनं तरुणींच्या हातात बाळ दिलं. या दोन्ही मुली या महिलेचे बाळ घेऊन लोकलमधून खाली उतरल्या पण महिला लोकलमधून न उतरता पसार झाली.
प्रथमदर्शी सामान अधिक असल्यामुळे खाली उतरता आलं नसावं असा अंदाज तरुणींनी लावला. बऱ्याच वेळेपर्यंत वाट पाहूनही ती महिला परत न आल्यामुळे त्यांनी बाळासह घरी जाऊन त्याची काळजी घेतली आणि नंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. बाळाला सोडून दिल्याबद्दल अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. दरम्यान पोलिसांनी चार पथके तयार केली असून, याशिवाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही महिला खानदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरल्याची माहिती समोर आली आहे.
नवजात बाळाला लोकलमध्ये सोडून महिला फरार
