| पनवेल | वार्ताहर |
सोनसाखळी चोरट्याने 52 वर्षीय पादचारी महिलेच्या चेहर्यावर दगडाने हल्ला करुन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तेथून पसार झाला. ही घटना नवीन पनवेल उपनगरात सेक्टर- 12 येथील रस्ता क्रमांक 1 येथे घडली. चोरट्याने महिलेचे गळ्यातील 83 हजार रुपयांची सोनसाखळी चोरी केल्याची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नवीन पनवेल उपनगरातील सेक्टर- 13 मध्ये राहणा-या नोकरदार महिला नारळ पाणी खरेदी करण्यासाठी सेक्टर 12 येथील रस्त्यावरुन पायी चालत होत्या. अचानक त्या महिलेच्या पाठीमागून आलेल्या 22 वर्षीय तरुणाने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. मात्र, महिलेने गळ्यातील सोनसाखळी पकडून ठेवल्याने चोरट्याने जवळचा दगड उचलून त्या महिलेच्या चेहर्यावर दगडाने हल्ला केला. महिलेच्या चेहर्यावर दगड लागल्याने त्यांनी सोनसाखळीवरील हात सोडून जखमेवर ठेवला. तोपर्यंत चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 32 ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून तेथून पळून गेला. या घटनेमुळे महिलांच्या सूरक्षेचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







