दोघांवर गुन्हा दाखल, एकास अटक
। रेवदंडा । वार्ताहर ।
बैलगाड्या आडव्या ठेवून बंद केलेला रस्ता खुला करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून कोर्लई येथील एकाने महिलेस शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये एकास रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे.
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोर्लई येथे दि.23 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कोर्लई ख्रिश्चन पाडा येथे रेवदंडाकडे जाणार्या मुख्य रस्त्यात बैलगाडी आडव्या टाकून रहदारीचा रस्ता बंद केल्याने वाहनास पुढे जाण्याचा मार्ग बंद झाला होता. यावेळी फिर्यादी महिलेने रहदारीचा रस्ता मोकळा करण्यास सांगितले. याचा राग मनात धरून फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. या झटापटीत महिला फिर्यादीचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. झटापट सोडविण्यास गेलेल्या वाहनचालकास आरोपी एक यांनी बैलगाडीचा लाकडी दांडका हातात घेऊन मारहाण करण्यास गेला. याबाबत महिला फिर्यादीने रेवदंडा पोलीस ठाणे येथे कोर्लई ख्रिश्चन पाडा येथील दोघांविरोधात तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी दोघांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कवळे हे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.