। पनवेल । प्रतिनिधी ।
फूटपाथवरून चालत असताना 39 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 18 ग्रॅमची चेन खेचून चोरटे पसार झाले. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
वीणा घाडगे या खारघर, सेक्टर 20 येथे वास्तव्यास आहे. त्या सकाळी विश्वज्योत शाळेच्या बाजूच्या रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी फूटपाथवरून चालताना दोन इसम मोटारसायकलवरून आले आणि पोलीस असल्याचे सांगितले. मात्र, घाडगे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर थोड्या वेळाने रेनकोट घातलेले दोन इसम मोटारसायकलवर आले आणि तुमच्या गळ्यातील सोने आहे ते काढा, असे सांगितले. तसेच दुसऱ्या एका अनोळखी इसमाला त्यांनी सांगून चेन काढायला सांगितली. घाडगे यांनी चेन काढून त्यांच्या हातातील कागदात ठेवली आणि कागदामध्ये गुंडाळून त्यांनी घाडगे यांच्या हातात दिली. थोडे अंतर चालत गेल्यावर त्यांनी गुंडाळलेली सोन्याची चेन पाहिली असता चेन ऐवजी दुसरी रुद्राक्षांची माळ होती. त्यांनी मागे पाहिले असता ते दोन्ही इसम मोटारसायकलवरून पळून गेले.






