| कोलाड | वार्ताहर |
मुंबईहून मंगळूरकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून पडून 30 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.13) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. गोवे गावाच्या हद्दीत, रेल्वे पोल क्र. 7/35 जवळ पटरी रेल्वेतून पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सविता हिरालाल मखवाना (30) ती रा. मेघानी, नगर शेरी-7, रणपूर अमहदाबाद, गुजरात येथील रहिवासी आहे. या महिलेचा तोल जाऊन ती रेल्वेतून खाली पडली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते, पोलीस कर्मचारी आणि रेस्क्यू एसव्हीआरएसएस टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एस. जी. भोजकर करीत आहेत.





