। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल-जेएनपीटी महामार्ग हा दिवसेंदिवस दुचाकीस्वारांसाठी जिवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रविवारी (दि.22) दुपारी लग्नसमारंभ आटपून घरी परतणार्या एका 39 वर्षीय विवाहितेला ग्रीट पावडरने भरलेल्या डंपरने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात स्वप्ना भोईर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती मिथुन भोईर गंभीर जखमी झाले. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
न्हावा गावात राहणारे स्वप्ना आणि मिथुन भोईर हे दाम्पत्य कर्जत येथील नातेवाईकांच्या लग्नसमारंभाला उपस्थित राहून दुचाकीवरून घरी परतत होते. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील गव्हाणफाटा येथील कान्होबा ढाब्याजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणार्या डंपरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्वप्ना या थेट डंपरच्या मागील चाकाखाली आल्या आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिथुन हे काही अंतरावर फेकले गेल्याने गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. अपघातानंतर स्वप्ना यांचा मृतदेह डंपरच्या चाकाखाली अडकलेला असल्याने तो बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीरपणे उपस्थित झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू , पती जखमी
