| पनवेल | वार्ताहर |
डी-मार्टमध्ये खरेदीसाठी रस्ता ओलांडून जाणाऱ्या एका महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा-पनवेल मार्गावर खिडूकपाडा येथे घडली. या अपघातानंतर पळून गेलेल्या वाहन चालकाविरोधात कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील मृत महिला मुलकीदेवी मल्लाह (60) या कळंबोली येथील खिडूकपाडा गाव येथे कुटुंबासह राहत होत्या. त्या मुंब्रा-पनवेल मार्गाच्या पलिकडे असलेल्या डी-मार्टमध्ये जात असताना, मुंब्राकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामुळे मुलकीदेवी या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना धडक देणाऱ्या वाहनचालकाने त्या ठिकाणावरून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच मुलकीदेवी यांच्या पतीने घटनास्थळी धाव घेऊन पत्नीला कळंबोली एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.







