दहा दिवसांच्या बाळासह सहा जण जखमी
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली. ही घटना शनिवारी (दि. 26) पहाटे घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये एका 10 दिवसांच्या बाळासह एका लहान मुलाचाही समावेश आहे.
मिळेलेल्या माहितीनुसार, लोखंडवाला परिसरातील अशोक ॲकॅडमी लेनमधील आठ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरात अचानक आग लागली. ही घटना शनिवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडली. त्यामुळे घरातील सर्वजण झोपेत असल्यामुळे आग लागल्याचे कोणालाही समजले नाही. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण घरात धुराचे लोट पसरले. घरातील लोकांना जाग आली. तोपर्यंत आग आसपासच्या घरांमध्येही पसरली होती. आग लागल्याचे समजताच रहिवाशांनी घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. प्रचंड प्रमाणात धूर निर्माण झाला आणि या धूरामुळे महिला, पुरुष आणि लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास झाला. गुदमरल्यामुळे ते बेशुद्ध पडले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन जखमी व्यक्तींना चार बंगला येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालय जोगेश्वरी पूर्वेकडील ट्रॉमा केअर रुग्णालय आणि महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडील कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, अभिना संजय वालिया (34) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर अन्य जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये 3 वर्षांच्या मुलासह 10 दिवसांच्या बाळाचाही समावेश आहे.
या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत घरातील साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलातर्फे आगीच्या घटनेची चौकशी सुरू आहे.






