। संगमेश्वर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील शास्त्री पुलाजवळ शनिवारी (दि. 26) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. ही दरड एका रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना अचानक शास्त्री पुलाच्या बाजूच्या डोंगरावरून मोठी दरड खाली कोसळली. या दरडीच्या काही भागाचा फटका रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला लागला, ज्यामुळे ती किरकोळ जखमी झाली. तसेच, पुलाजवळ उभ्या असलेल्या एका रिक्षावर दरड कोसळल्याने रिक्षाचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला तातडीने प्राथमिक उपचार पुरवले. त्यानंतर कोसळलेली दरड आणि रिक्षा बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.