। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील कोंढवा येथील टिळेकरनगर परिसरात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीस्वार विजयकुमार शिवमंगल सिंग (53) हे त्यांची पत्नी पुनितादेवी विजयकुमार सिंग (46) यांच्यासह मंगळवारी (दि. 12) दुचाकीवरून टिळेकरनगर परिसरातून जात होते. त्याचवेळी भरधाव असलेल्या दुचाकीचा अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरली. त्यामुळे दुचाकीस्वार विजयकुमार आणि मागील सीटवर बसलेल्या पुनितादेवी दोघे खाली पडले. या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुनितादेवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार विजयकुमार यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.