| चिरनेर | वार्ताहर ।
विषारी सर्पदंशाने चिरनेर येथील प्रतिभा प्रकाश मोकल (45) या महिलेचा मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. 08) घडली. चिरनेर येथील रहिवासी प्रतिभा मोकल या आपल्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात दुपारच्या वेळेत एकट्याच काम करीत होत्या. यावेळी त्यांना विषारी सर्पाने दंश केला. आपल्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच, त्या घाबरून घरी आल्या. कुटुंबियांना सर्पदंश झाल्याचे सांगताच, त्यांनी तातडीने त्यांना कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक तपासणी, तात्पुरते उपचार करून उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच प्रतिभा मोकल यांचा मृत्यू झाला झाला होता. अशी माहिती इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाळासो काळेल यांनी दिली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.