| उरण | प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील डोंगरी गावात घराच्या अंगणात साप चावल्याने एका महिलेचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. इंदुमती नरेंद्र पाटील रा. डोंगरी असे मृत महिलेचे नाव असून, त्यांना अतिविषारी मण्यार सापाने दंश केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात सर्पदंशापासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
इंदुमती पाटील या अत्यंत मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाच्या गृहिणी म्हणून परिचित होत्या. घराच्या अंगणात असताना त्यांना सापाने दंश केला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. डोंगरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उरण तालुका हा खाडीकिनारी व डोंगराळ भागात वसलेला असल्याने पावसाळ्यात सापांचे प्रमाण वाढते. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे सर्पमित्र विवेक केणी यांनी सांगितले. दरम्यान, ‘वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था’तर्फे ही पावसाळ्यात सापांपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्पदंश झाल्यास कोणत्याही प्रकारचे घरगुती उपाय न करता किंवा घाबरून न जाता, रुग्णाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
उरणमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
