रक्षकच बनले भक्षक! कर्जतमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेचा विनयभंग

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरात बाजारहाट करून दोन महिला आपल्या घरी गुंडगे येथे परतत असताना एका व्यक्तीने “चल येते काय” असे दोनदा बोलल्यावर सोबत असलेल्या महिलेने त्याबाबत व्हिडिओ तयार केला. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर तब्बल सहा तासांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या विनयभंग प्रकरणातील आरोपी हा चक्क पोलीस कर्मचारी निघाला असून, पोलिसच भक्षक बनल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत शहरातील जकात नाका येथील रेल्वे स्टेशनच्या पुलावरून रविवारी (दि. 13) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला आपल्या बहिणीसोबत कर्जत बाजारातून गुंडगे येथील आपल्या घरी परतत होती. कर्जत जकात नाक्याजवळील रेल्वे पुलावरून जात असताना मागून आलेल्या दोन मद्यधुंद व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. त्यातील एकाने “चल येते का चल” असे म्हणत महिलेची छेड काढली. त्यानंतर महिलेच्या पतीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना विचारणा केली असता, छेडछाड करणारा एक व्यक्ती हा पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील रा. भिसेगाव आणि त्याचा साथीदार महेंद्र भंडारे रा. गुंडगे असल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडिओ महिलेच्या बहिणीने मोबाईलमध्ये कैद केला असता, पोलीस कर्मचाऱ्याने तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

पोलीस ठाण्यात ग्रामस्थांचा ठिय्या
घटनेनंतर पीडित महिला आणि तिचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. परंतु, महिलेची छेड काढणारा व्यक्ती हा पोलीस दलातीलच असल्याने सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. या घटनेची माहिती मिळताच सुमारे २० ते ३० गावकरी पोलीस ठाण्यात जमा झाले आणि त्यांनी कारवाईसाठी पोलिसांवर दबाव आणला. अखेर ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील आणि महेंद्र भंडारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत.
Exit mobile version