| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, दिल्लीत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असताना महिला खासदाराची चेन हिसकावून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजधानी दिल्लीत नेते ज्या भागात राहात आहेत, तिथे सुरक्षेची अशी स्थिती असेल, तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे. सुधा रामकृष्णन असे महिला खासदाराचे नाव आहे. सुधा रामकृष्णन सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेल्या होत्या. चाणक्यपुरी परिसरात चालत असताना काही जण आले आणि त्यांच्या गळ्यातली चेन चोरून फरार झाले. या घटनेने सुधा रामकृष्णन यांना धक्का बसला असून त्या घाबरल्या आहेत. सुधा रामकृष्णन यांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दिल्ली पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी रेखा गुप्ता यांच्या दिल्लीतील सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, काँग्रेस खासदार सुधा रामकृष्णन यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या घटनेची माहिती दिली आहे. पोलंड दुतावासाजवळ सोन्याची चेन हिसकावण्यात आली. या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी खासदार रामकृष्णन यांनी केली आहे.







