नागोठणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
| नागोठणे | प्रतिनिधी |
दोन दिवसांपूर्वीच पूर येऊन गेलेल्या आणि सध्याही तुडुंब भरून वाहणाऱ्या नागोठण्यातील अंबा नदीच्या पात्रात उडी घेणाऱ्या विवाहित महिलेला वाचविण्यात नागोठणे पोलिसांना यश आले आहे. या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वाघ व पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव यांच्यासह नागोठणे पोलीस ठाण्यातील सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नागोठण्यातील राम नगर येथील 25 वर्षीय विवाहित महिलेने कौटुंबिक वाद व घरगुती भांडणातून रागाच्या भरात नागोठण्यातील जुन्या ऐतिहासिक पुलावरून अंबा नदीच्या पात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.21) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्यासह पो.हे. कॉ. महेश लांगी, पो.हे. कॉ. महेश रुईकर, पो.हे. कॉ. अथर्व पाटील, वाहतूक शाखेचे महाड येथे कार्यरत असलेले मात्र नागोठण्यात राहणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चंद्रकांत वाघ, पोलीस हवालदार स्वप्नील भालेराव, पोलीस शिपाई विक्रांत बांधणकर जुन्या पुलाजवळील घटनास्थळी पोहोचले. मात्र, ही महिला पाण्याच्या प्रवाहात खालील बाजूस वाहून गेल्याने थोडाही वेळ न घालविता सर्वजण नागोठणे उरुस सर्कल येथील नवीन पुलाजवळ पोचले. यावेळी सुनील वाघ व स्वप्नील भालेराव यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याच्या प्रवाहात उतरून पाण्यात वाहून जाणाऱ्या या महिलेला पाण्याबाहेर काढले. ही महिला जर नवीन पुलाच्या खालील बाजूस असलेल्या नदीच्या खाडी पात्रात वाहून गेली असती तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. दरम्यान नंतर या महिलेवर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तद्नंतर या महिलेचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी समुपदेशन करून महिलेला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. नागोठणे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, सुनील वाघ, स्वप्नील भालेराव यांच्यासह या मोहिमेत सहभागी सर्व पोलिसांना शाबासकीची थाप मिळत आहे.







