। रसायनी । प्रतिनिधी ।
बारवई येथे चहाच्या टपरीवर असलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची घटना वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीलगत घडली. या प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखा कक्ष-3च्या पथकाने अवघ्या चार तासांत अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेला चाकू, दोन लोखंडी कोयते आणि काळ्या रंगाची बॅग हस्तगत करण्यात आली आहे. अन्य तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मीना कातकरी या बारवई येथील चहाच्या टपरीवर असताना चार आरोपी तेथे आले. त्यांनी कातकरी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, मोबाईल फोन तसेच रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा कक्ष-3च्या पथकाने तपास सुरू केला. चोरीला गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. त्यानंतर इंदापूर पोलिसांच्या मदतीने मंगेश देसाई काळे ऊर्फ राहुल कांता राज पवार ऊर्फ मंजू (19) याला ताब्यात घेण्यात आले. तो सध्या सरडेवाडी, इंदापूर येथे राहत असून मूळचा डोमेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेला चाकू, दोन लोखंडी कोयते आणि काळ्या रंगाची बॅग जप्त केली आहे. तपासा दरम्यान आरोपीचा पोलीस ठाण्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यासह शहापूर पोलीस ठाणे तसेच इचलकरंजी, कोल्हापूर येथील आणखी एका गुन्ह्याशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील फरार असलेल्या अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.
बारवई येथे महिलेची चाकूचा धाक दाखवून लूट
