। मुंबई । प्रतिनिधी ।
समाज माध्यमावर भेटलेल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एका विवाहित महिलेने स्वत:च्याच घरात चोरी केल्याची घटना घडली आहे. मात्र, हा प्रियकर भामटा निघाला आणि या महिलेची 10 लाखांची फसणूक झाली. दुसरीकडे चोरीचे बिंग फुटल्याने महिलेला पोलिसांनी अटक केली. या महिलेचे स्वत:च्या मुलीच्या प्रियकराशीही संबंध असल्याचे उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात एक पालिका कर्मचारी पत्नी आणि मुलीसह राहतो. त्यांच्या घरात 28 ऑगस्ट रोजी चोरी झाली. अज्ञात चोराने घरातील 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत दिंडोशी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केला असता घरात चोरी झाल्याच्या कुठल्याही खाणाखुणा नव्हत्या. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले असता काहीच संशयास्पद आढळले नाही. दरवाजा तोडलेला नव्हता की खिडकीतून कुणी प्रवेश करणे शक्य नव्हते. यानंतर तक्रारदाराच्या 42 वर्षीय पत्नीनेच ही चोरी केल्याचा पतीने संशय व्यक्त केला.
दिंडोशी पोलिसांनी या रहस्यमय चोरीचा तपास सुरू केला. पतीची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांच्यातील नातेसंंबधात कटुता असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यांनी पत्नीच्या मोबाइलचे तपशील मिळवले. त्यावेळी एका अज्ञात क्रमांकावरून सतत फोन येत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी केलेल्या चौकशीत खुलासा झाला. ती व्यक्ती या महिलेचा प्रियकर होती. दोघे पळून जाणार होते. त्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे या महिलेने आपल्याच घरात चोरी झाल्याचा बनाव रचला होता. या महिलेवर चोरी केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.







