उपचाराच्या नावाखाली महिलेवर अत्याचार

। मुंबई । प्रतिनिधी |

एका 32 वर्षीय महिलेवर भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली बलात्कार केला आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली. सांताक्रुझ परिसरात राहणारी पीडित महिला गेल्या काही काळापासून कौटुंबिक समस्या आणि शारीरिक व्याधींमुळे त्रस्त होती. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी तिने अब्दुल रशीद (45) नावाच्या एका भोंदू बाबाकडे मदत मागितली. या भोंदू बाबाने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यावर भूतबाधा झाल्याचे त्याने सांगितले. तांत्रिक विधी करून भूतबाधा दूर करता येते असे त्याने तिला पटवून दिले.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कथित उपचारासाठी त्याने पीडित महिलेला भेटायला बोलावले. तिथे तांत्रिक विधीचे नाटक करून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर काही काळ पीडितेला हा एक उपचार असल्याचा गैरसमज होता, मात्र नंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने मंगळवारी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आरोपी अब्दुल रशीद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बुधवारी अब्दुल रशीदला अटक केली. या घटनेमुळे समाजात अशा भोंदू बाबांविरोधात कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये आणि कोणत्याही उपचारासाठी वैज्ञानिक आणि योग्य मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांताक्रुझ पोलीस करीत आहेत.

Exit mobile version