महावितरण कार्यालयात तीन महिन्यांपासून हेलपाटे; अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केल्याचा आरोप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भरमसाठ वीज बिलामुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने अखेर महावितरण कार्यालयाबाहेरच टाहो फोडत संताप व्यक्त केला. गेल्या तीन महिन्यांपासून कार्यालयात फेऱ्या मारूनही संबंधित अधिकाऱ्यांनी समस्येचे निराकरण केले नाही, असा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे संतप्त झालेल्या या महिलेची व्यथा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
बुधवारी दुपारी अलिबाग येथील महावितरण कार्यालयाबाहेर संबंधित महिलेने अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे आणि अभियंता वैभव डफळ यांच्याविरोधात जोरदार संताप व्यक्त करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. या प्रकारामुळे महावितरण प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील उज्ज्वला आळशी असे या महिलेचे नाव आहे. सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या या महिलेच्या घरात महावितरणचे जुने मीटर बसविण्यात आले होते. संबंधित मीटरची तपासणी करण्यात आली असता ते सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतर महावितरणकडून जुन्या मीटरच्या शेजारी स्मार्ट मीटर बसविण्यात आले. सध्या दोन्ही मीटर सुरू असल्याचा आरोप करण्यात येत असून, याच गलथान कारभाराचा फटका महिलेला बसल्याचे समोर आले आहे.
महिलेला तब्बल 68 हजार रुपयांहून अधिक वीज बिल आल्याने ती धास्तावली आहे. हे बिल कमी करून द्यावे यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून ती महावितरण कार्यालयात हेलपाटे मारत आहे. कार्यकारी अभियंता शैलेंद्र कुमार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांच्याकडे पाठविले. मात्र, तायडे यांनी भेट टाळत समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलेने केला आहे. अभियंता वैभव डफळ यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समस्येच्या गर्तेत अडकलेल्या या महिलेला न्याय देण्याऐवजी महावितरणचे अधिकारी उदासीन राहिल्याने अखेर संतप्त झालेल्या महिलेने कार्यालयाबाहेरच आक्रोश केला. डफळ यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी तिने केली आहे. महिलांच्या सन्मानाबाबत शासनाकडून सातत्याने सूचना दिल्या जात असताना, प्रत्यक्षात महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना महिलेच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे चित्र बुधवारी अलिबागमध्ये पाहायला मिळाले.
जुन्या मीटरसह त्याच जागी स्मार्ट मीटर बसवून आर्थिक लूट केल्याचा आरोपही महिलेकडून करण्यात आला आहे. 68 हजार रुपयांच्या वीज बिलामुळे संतप्त झालेल्या महिलेने महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तायडे आणि वैभव डफळ यांच्याविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न?
वरसोली येथील आळशी यांच्या घरात जुने मीटर कार्यरत असतानाच नवीन स्मार्ट मीटर “टेस्टिंग”साठी बसविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोन्ही मीटर सुरू असल्याने बिलात प्रचंड वाढ झाल्याचा आरोप आहे. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली असता एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
जुने मीटर आहे. नवीन मीटर टेस्टिंगसाठी बसविण्यात आले आहे. पार्ट पेमेंट करण्यास साहेबांनी सांगितले आहे. बाकीची माहिती तायडे साहेब देतील.
वैभव डफळ,
अभियंता, महावितरण
