शिंदे गटातील सरपंचाविरोधात महिला आक्रमक

ग्रामसभेत धमकावून अपशब्द वापरल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार; अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांच्यामार्फत निवेदन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील बेटरवल्ड डिझाईन प्रा.लि. या कंपनीत काम करणार्‍या स्थानिक महिलांना धमकावून अपशब्द वापरल्याप्रकरणी महिला आक्रमक झाल्या आहेत. शिंदे गटातील सरपंच उदय म्हात्रे यांच्यासह वीस जणांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबत शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना निवेदन दिले आहे. महिलांना अपशब्द बोलणार्‍यांविरोधात कारवाई करून महिलांना न्याय द्या, अशी मागणी अ‍ॅड. म्हात्रे यांनी केली आहे.

नारंगी ग्रामपंचायत हद्दीतील बेटरवल्ड डिझाईन प्रा.लि. कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून अनेक महिला काम करीत आहेत. रोजच्या व्यवहारातील पिशव्या तयार करून वेगवेगळ्या देशात त्या पुरवठा केल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. गावासह परिसरातील 65 महिला व सहा पुरुषांच्या रोजगाराचे साधन खुले झाले आहे. या कंपनीचे काम नारंगी येथील प्रणिता विनोद पाटील पाहात आहेत. हा व्यवसाय विनोद पाटील यांच्या घरामध्ये सुरु आहे.
बेटरवल्ड डिझाईन प्रा.लि. या कंपनीचे काम सर्व नियमांचे पालन करीत केले जात आहे. मात्र, नारंगीचे सरपंच, उपसरपंच, काही सदस्य तसेच काही स्थानिक यांनी आपापसात संगमनत करून ही कंपनी बंद पाडण्याचा डाव आखला आहे. कोणालाही विश्‍वासात न घेता कंपनी बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत परस्पर घेतला आहे. परिसरातील गोरगरीब महिलांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून देणारी कंपनी बंद पाडून महिलांना राजकीय हेतूने नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असताना, शिंदे गटातील सरपंच महिलांच्या तोंडातील घास काढण्याचा डाव आखत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याविरोधात सर्व महिलांनी एकत्र येऊन 26 ऑगस्ट रोजी नारंगीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महिलांनी सरपंच म्हात्रे यांना जाब विचारला. त्यावेळी सरपंचाने गलिच्छ भाषेत महिलांना अपशब्द बोलून त्यांचा अपमान केला. या प्रकारामुळे महिलांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. याबाबत शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनीदेखील सरपंच व त्यांच्या इतर मंडळींविरोधात निषेध व्यक्त केला.

सूडबुद्धीने कंपनीविरोधात भूमिका घेऊन महिलांवर अन्याय करणार्‍या सरपंचाविरोधात अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला. सोमवारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती त्यांना दिली. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोेर साळे यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधितांविरोधात कारवाई करून महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version