महिला दिनानिमित्त केला गौरव
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि त्याचे सबलीकरण करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेने पावले उचलत शहरातील महिलांना मोफत रिक्षा चालकाचे रितसर प्रशिक्षण दिले. गेल्या वर्षी महिला दिनी प्रशिक्षणाला सुरुवात केलेल्या या महिलांना यावर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि उपनगराध्यक्ष अॅड मानसी म्हात्रे, डॉ मेघा घाटे, मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरणी करत गौरव करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता विशेष आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अबोली योजनेअंतर्गत महिला व बालकल्याण विभागातर्फे रिक्षा चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षित महिलांना रिक्षा खरेदीसाठी कर्ज देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांनी यावेळी दिली. त्यामुळे खर्या अर्थाने नगरपरिषदेने महिला सबलीकरणासाठी पुढाकार घेतला असल्याचे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिसून येत आहे. अलिबागमध्ये पर्यटनास लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. शहरात आणि बाजूच्या परिसरात पर्यटनास फिरण्यास शहरात रिक्षाची सुविधा आहे. सध्या शहरात पुरुष हेच रिक्षा चालवत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे वा इतर शहरात महिलाही रिक्षा चालवित आहेत. मात्र, जिल्ह्यात महिला रिक्षाचालक नाहीत. त्यादृष्टीने अलिबाग नगरपरिषद जिल्ह्यात पहिलीच नगरपरिषद महिलांना रिक्षा चालविण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.
शहरातील दहाहून अधिक महिलांना रिक्षा चालविण्याचे मोफत प्रशिक्षण तसेच लायसन्स, बॅच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आज स्नेहा कांदु, रुपाली थळे, पूजा राऊत, मनिषा करंबत, प्रियांका पवार, दिपाली सुर्यवंशी, पल्लवी सुतार, प्रिया कुंडी, दिक्षा म्हात्रे, संजना चाफेकर, रुक्मीणी पटेल या महिलांनी पुढे येऊन रिक्षा चालविण्याचा निर्धार केला आहे. नगरपरिषद महिला व बालकल्याण विभागाकडून या महिलांना साई मोटर्सतर्फे संचालक मेहूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी नगरसेवक वृषाली ठोसर, सुषमा पाटील, अश्विनी पाटील, संजना किर, राकेश चौलकर, अनिल चोपडा उपस्थित होते.