लोकसभेसाठी सात महिला नियंत्रित मतदान केंद्र
। रायगड । सुयोग आंग्रे ।
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी 400 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. यासाठी रायगड जिल्ह्यातील मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील सात मतदान केंद्रांवर महिलाराज असणार आहे. पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला नियंत्रित मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.
भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जाते. या 15 दिवसात हा उत्सव साजरा करण्यात राजकीय पक्ष कसलीच कसर ठेवत नाही. मात्र या उत्सवावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचे काम निवडणूक आयोग करीत असतो. अमर्याद अधिकार राखून असलेल्या आयोगाचे अधिकारी प्रत्येक बाबीवर निगराणी ठेवतानाच अभिनव उपक्रम पण राबवून लक्ष वेधून घेतात. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक अंमलबजावणीचा आराखडा तयार करतांना महिलांना अग्रभागी ठेवत एक उपक्रम आणला आहे. ज्या मतदान केंद्रात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी केंद्राची पूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचार्यांवर सोपविण्याचे ठरले आहे.
अधिकाधिक महिलांनी मतदानाचा हक्क पार पाडावा, म्हणून हा उपक्रम असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व अन्य जबाबदारी निवडणूक सेवेतील महिलाच सांभाळणा आहेत. प्रायोगिक तत्वावर सात मतदान केंद्राची निवड झाली आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहे. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही; तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
’’महिला नियंत्रित मतदान केंद्र’’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकार्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर युवा मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र आणि युनिक मतदान केंद्रांची निर्मिती रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघामध्ये केली जाणार आहे.
रायगड जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघामध्ये विभागाला गेला आहे. यामध्ये रायगड लोकसभेसाठी चार विधानसभा मतदारसंघ तर मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. रायगड जिल्ह्यातील मतदानकेंद्रांपैकी सात मतदान केंद्र महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये पेण विधानसभा मतदार संघात मतदान केंद्र 101 प्रभुआळी खोली क्रमांक 1, अलिबागमध्ये मतदान केंद्र 172 अलिबाग 5, श्रीवर्धनमध्ये 167 उतेखोल 4, महाडमध्ये 230, महाड 3 खोली क्रमांक 4 आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पनवेल 332 पनवेल महानगर पालिका शाळा खोली क्रमांक 1, कर्जतमध्ये 293, खोपोली 49 खोली क्रमांक 3 आणि उरण विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र 249 उरण खोली क्रमांक 5 असे असणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील महिला नियंत्रित मतदान केंद्रांबरोबरच तरुण मतदार असणार्या मतदान केंद्रांवर तरुण अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. युवा नियंत्रित मतदान केंद्रदेखील सात असणार आहेत. दिव्यांग अधिकारी आणि कर्मचार्यांचे पथक तैनात असणारे सात मतदान केंद्र असणार आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये सात युनिक मतदान केंद्रदेखील तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच अधिकारी आणि कर्मचारी असे पथक तैनात राहून मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे.
स्नेहा उबाळे,
उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी